महाविकास आघाडीला यंदा पुण्यात विधानसभेच्या 3 ते 4 जागा मिळतील असं वातावरण लोकसभेनंतर तयार झालं होते. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर उमेदवारीच्या समीकरणात 3 विधानसभेमध्ये काँग्रेसने कँटोंमेंटमधून रमेश बागवे, कसब्यात रविंद्र धंगेकर आणि शिवाजीनगरमधून दत्ता बहिरट असे तगडे उमेदवार दिले. पण काँग्रेसच्या निवृत्तीकडे झुकलेल्या कमल व्यवहारे , आबा बागुल आणि मनिष आनंद या नेत्यांनी ही शेवटची संधी वाटल्याने त्यांनी 3 विधानसभांमध्ये अर्ज दाखल करत बंडखोरी केली. अर्ज माघारीपर्यंत हे अर्ज मागे घेतले जातील असं वाटत असतानाच तिघांनी ही अर्ज कायम ठेवल्याने या मतदारसंघाची गणितच बदलली आहेत.
advertisement
अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत या बंडखोरांसोबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी योग्य ती चर्चा न केल्याने आणि आश्वासन न देता बंडखोरी गांभीर्याने न घेतल्याने महाविकासआघाडीच्या या तिन्ही जागा अडचणीत आल्यात. याउलट भाजपने बंडखोरांना अत्यंत गांभीर्याने घेत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून त्यांच्या घरी जाऊन आश्वासित करून बंडखोरी थंड केली आणि त्यांना प्रचारात ही सक्रिय केले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नेहमीप्रमाणे दरबारी राजकारण करत आता वेळ गेल्यावर या नेत्यांवर कारवाईची छडी उगारलीय.
काँग्रेसच्या या सरंजामी आणि दरबारी राजकारणाचा फटका पुण्यात तीन जागांवर महाविकास आघाडीला बसणार हे निश्चित आहे. हाच पवित्रा काँग्रेसने बदलला नाही तर काँग्रेस पराभूत होईल असं मत राजकीय वर्तुळात व्यक्त केलं जातंय.
