मतदानासाठी आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी असताना मविआतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद सुरू आहे. दोन्ही पक्षांमध्ये 15 जागांवर वाद सुरू होता. यामध्ये विदर्भातील 12 जागांवर वाद होता.
जागा वाटपाचा तिढा सुटला...
महाविकास आघाडीत विदर्भातील जागांवरून तिढा होता. विदर्भात अधिकाधिक जागांसाठी काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू होती. आता महाविकास आघाडीत विदर्भातील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. ठाकरे गटाने दावा केलेल्या विदर्भातील 12 जागांपैकी बहुतांश जागा काँग्रेसकडेच राहणार आहेत. विदर्भातील 62 जागांपैकी 40 जागांवर काँग्रेसचे उमेदवार लढणार आहेत.
advertisement
सूत्रांच्या माहितीनुसार, जागा वाटपाच्या चर्चेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिष्ठेची केलेली दक्षिण नागपूरची जागा काँग्रेसकडेच राहणार आहे. दक्षिण नागपूर मतदारसंघातून गिरीश पांडव यांची उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची यादी कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी केल्यानंतर काल दिवसभर काँग्रेस नेत्यांच्या मुंबईत बैठका झाल्या. विदर्भातील काही जागांवर शिवसेनेचा दावा मान्य करण्यात आला. पण विदर्भातील बहुतांश जागा काँग्रेसच लढवणार असल्याची माहिती आहे.
बाळासाहेब थोरातांवर सोपवली होती जबाबदारी...
काँग्रेसने ठाकरे गटासोबत सुरू असलेला वाद संपवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेस हायकमांडने चर्चेची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार, मंगळवारी, बाळासाहेब थोरात यांनी सकाली सिल्वर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पवारांसोबत चर्चा केल्यानंतर थोरात यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली.
