विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 29 ऑक्टोबरही मुदत होती. ही मुदत संपेपर्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. काही ठिकाणी आपल्या मित्रपक्षाच्या उमेदवाराविरोधात उमेदवार उतरवण्यात आला. शेवटच्या क्षणी काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. त्याशिवाय, इच्छुक नाराज उमेदवारांनीदेखील बंड करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
बंडखोर वाढवणार टेन्शन...
राज्यातील प्रमुख दोन आघाडींसाठी ही बंडखोरी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये जवळपास 80 ठिकाणी बंडखोर उभे करण्यात आल्याचे चित्र आहे. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख ही 4 नोव्हेंबर आहे. या दरम्यानच्या कालावधीत बंडोंबांना थंड करण्याचे जोरदार प्रयत्न होणार आहेत. युती-आघाड्यांमध्येही याच कालावधीत चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता असून काही ठिकाणचे उमेदवार मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.
advertisement
महायुती, महाविकास आघाडीकडून किती उमेदवार?
निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे 103, शिवसेना ठाकरे गट 96, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून 87 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. महाविकास आघाडीने आपल्या मित्रपक्षांना हाताच्या बोटावर मोजण्या इतपत जागा सोडल्या. त्यामुळे मविआवर मित्रपक्ष नाराज आहेत. तर महायुतीकडून 286 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजप 152, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी 52 अशी उमेदवारांची संख्या आहे.
महायुतीतील घटक पक्षांकडून काही मतदारसंघात दोन उमेदवार जाहीर केले आहेत. तर, दोन जागांवर एकही उमेदवार नाही. महायुतीने 286 जागांवर 289 उमेदवार उभे केले आहेत. तीन जागांवर महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
