राज्याच्या राजकारणात शिवसेना हा गेल्या अनेक दशकांपासून प्रमुख राजकीय पक्ष राहिल आहे. पण सध्याच्या विधानसभा निवडणुकीत याच शिवसेनेतून निर्माण झालेले तीन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढताना दिसत आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना आज अस्तित्वाची लढाई लढतेय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच दैवत मानणारे तीन पक्ष आज एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतायत. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिंदेंची शिवसेना विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा लढती मुंबईतील अनेक मतदारसंघात पाहायला मिळणार आहेत.
advertisement
>> कोणत्या मतदारसंघात होणार लढती...
> माहिम-दादर
शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात यंदा तिरंगी लढत होतेय. शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर आणि यांच्या विरोधात मनेसेचे नेते अमित ठाकरे यांची उमेदवारी घोषित झालीय. त्यामुळे दादर माहीममध्ये कुणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता आहे
> वरळी विधानसभा मतदारसंघ
शिवसेनेच्या या पारंपरिक मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षांकडून आदित्य ठाकरे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात मनसेचे नेते संदिप देशपांडे उमेदवार आहेत… आणि शिंदेंच्या सेनेकडून मिलिंद देवरांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे वरळीची लढत हायव्होल्टेज लढत ठरणार आहे.
> शिवडी-लालबाग विधानसभा मतदारसंघ
शिवडी-लालबाग हा कट्टर शिवसैनिकांचा बालेकिल्ला. इथे शिवसेना ठाकरेंच्या पक्षानं अजय चौधरींना उमेदवारी दिलीय तर मनसेकडून नेते बाळा नांदगावकर आणि शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार जाहीर झालेला नाही. पण इथेही तिरंगी लढतीची अपेक्षा आहे.
> भांडुप विधानसभा मतदारसंघ
भांडुप हा प्रामुख्यानं कोकणवासीयांचं प्राबल्य असलेला मतदारसंघ. इथे शिवसेना ठाकरे गटाकडून रमेश कोरगावकर, मनसेचे नेते शिरीष सावंत यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवार देणं बाकी आहे.
> चेंबूर विधानसभा मतदारसंघ
याशिवाय चेंबूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून प्रकाश फातर्पेकर, मनसेकडून माऊली थोरवे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून तुकाराम काथेंच्या नावाची चर्चा सुरू आहे.
> मागाठणे विधानसभा मतदारसंघ
मागाठणेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे प्रकाश सुर्वे, मनसेकडून नयन कदम मैदानात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजना घाडी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
> दिंडोशी विधानसभा मतदारसंघ
दिंडोशीत शिवसेना ठाकरे गटाकडून सुनिल प्रभूंना उमेदवारी मिळाली आहे. तर मनसेकडून भास्कर परब मैदानात आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवार देणं अद्याप बाकी आहे.
> जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ
जोगेश्वरी पूर्वमध्ये शिंदेंकडून मनिषा रविंद्र वायकर तर शिवसेना ठाकरे गटाकडून बाळा नर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर मनेसेकडून भालचंद्र अंबुरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
> अंधेरी पूर्व
या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गट भाजपचे स्थानिक नेते मुरजी पटेल यांचा पक्ष प्रवेश करून उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे.
मुंबईत मोजक्या मतदारसंघात मनेसेनं त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. तर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपात दोन्ही शिवसेनेकडून उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे हे तीन पक्ष, त्यांचे कार्यकर्ते आता एकमेकांविरोधातच उभे ठाकणार आहे.
