महेश सावंत हे सदा सरवणकर यांचे सध्याचे कट्टर विरोधक समजले जातात. पण, महेश सावंत हे सध्याचे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. आता, विधानसभा निवडणुकीच्या मैदानात महेश सावंत हे थेट सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांना आव्हान देणार आहेत.
महेश सावंत आहे तरी कोण?
advertisement
महेश सावंत प्रभादेवीमधील जुने शिवसैनिक आहेत. प्रभादेवी, दादर, परळ हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. गिरण्या जोमात असताना या कधीकाळी भागात कम्युनिस्टांचा प्रभाव होता. मात्र, कालांतराने या भागात शिवसेनेचा प्रभाव वाढला. मोठ्या प्रमाणावर मराठी माणसांची वस्ती या भागात आहे. महेश सावंत यांचे वडील देखील शिवसेनेत होते. वडिलांच्या प्रभावाने महेश सावंत यांनी 1990 पासून शिवसेनेत सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली. विभागात शिवसेनेचे आंदोलन, सामाजिक उपक्रमात मोठा सहभाग असायचा. त्याच्या जोरावर महेश सावंत यांचा परिसरात चांगला जनसंपर्क तयार झाला.
सदा सरवणकर सोबत काँग्रेसमध्ये प्रवेश आणि घरवापसी...
सध्या शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांची प्रभादेवी भागावर पकड होती. कधीकाळी गिरणीत असणारे सदा सरवणकर हे तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले होते. स्थायी समितीवरदेखील सदा सरवणकर होते. महेश सावंत हे सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र, वर्ष 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आदेश बांदेकरांना उमेदवारी जाहीर केली आणि सदा सरवणकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. नारायण राणे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत सरवणकरही जाणार होते अशी चर्चा होती. पण 2009 च्या विधानसभा निवडणुकीत सरवणकर यांनी काँग्रेसचा हात पकडला. सदा सरवणकर यांच्यासोबत जी मोजकी मंडळी गेली त्यात महेश सावंत यांचाही समावेश होता. काही वर्षांनी सदा सरवणकर पुन्हा शिवसेनेत आले तेव्हा महेश सावंत देखील शिवसेनेत परतले.
सरवणकरांसोबत वितुष्ट...
सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात 2017 च्या सुमारास वितुष्ट निर्माण झाले. पक्षासाठी काम करूनही महापालिका निवडणुकीत डावलण्यात येत असल्याची सल सावंत यांच्या मनात होती. 2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत सदा सरवणकर यांनी आपला मुलगा समाधान सरवणकर याची उमेदवारी पक्षाकडून मिळवली. त्यानंतर महेश सावंत यांनी बंड पुकारत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या महापालिका निवडणुकी दरम्यान सरवणकर आणि सावंत यांच्यात तणाव निर्माण झाला होता.
महापालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवार समाधान सरवणकर यांना 8623 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमदेवार महेश सावंत यांना 8364 मते मिळाली. या महापालिका निवडणुकीनंतर सावंत पुन्हा शिवसेनेत परतले. सदा सरवणकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने सावंत यांना विभागप्रमुखपदाची जबाबदारी दिली.
शिवसेनेचा शिलेदार...
शिवसेनेतील फुटीनंतर महेश सावंत यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला सांभाळला. गणेश विसर्जन दरम्यान सदा सरवणकर आणि त्यांच्या समर्थकांसोबत वादही झाला होता. या वादात सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. शिंदे गटासोबत झालेल्या राड्यामुळे सावंत आणि इतर शिवसैनिकांना अटक झाली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट घेऊन त्यांचे कौतुक केले होते.
