ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या हवाल्याने एका वृत्तपत्रात मोठे दावे करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. वृत्तानुसार, ‘अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका… ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला… माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता…’ असे भुजबळ यांनी सूचित केले असल्याचे वृत्तात म्हटले.
advertisement
राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील हवाल्यानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना ईडी साखर कारखाना व्यवहाराप्रकरणी अटक करणार होती. त्याआधी अजित पवार, सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि भाजपसोबत जाण्याचा मुद्दा मांडला. या भूमिकेमुळे तपास यंत्रणांची कारवाई थंड होईल असा त्यांचा होरा होता. मात्र, पवारांनी याला नकार दिला. त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट भाजपसोबत केला.
छगन भुजबळ यांनी काय म्हटले?
छगन भुजबळ यांच्या हवाल्याने वृत्त प्रसिद्ध झाल्याने एकच खळबळ उडाली. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, आपण वृत्तपत्राला कोणतीही मुलाखत दिली नाही. आम्ही अजित पवारांच्या नेतृ्त्वात भाजपसोबत गेल्यानंतर आमच्यावर आधीपासूनच आरोप होत आहेत. विकासाच्या भूमिकेतून भाजपला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हा मुद्दा कसा उपस्थित झाला, यावर भुजबळांनी प्रश्न उपस्थित केला.
मला क्लिनचीट...भाजपसोबत का?
छगन भुजबळ यांनी सांगितले की, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मला क्लिनचीट मिळाली आहे. ही क्लिनचीट मला भाजपसोबत आल्यावर नाही मिळाली तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मिळाली आहे. माझ्यावर ईडीची कारवाई झाली होती. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने तुरुंगाबाहेर आलो. आमच्यासोबत असणाऱ्या 50 पैकी सगळ्याच आमदारांवर ईडी चौकशी नव्हती, असेही भुजबळांनी सांगितले.
भाजपसोबत सत्तेत गेल्याने मतदारसंघात चांगली कामे सुरू झाली. आज मतदारसंघात विकास कामे सुरू आहेत. आम्ही विकासासाठी गेलो होतो असेही त्यांनी म्हटले.
पुस्तकावर कायदेशीर कारवाई?
छगन भुजबळ यांनी म्हटले की, आपण राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकावर कायदेशीर कारवाईबाबत विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी पुस्तक वाचलं नाही पण ते पुस्तक वाचणार आणि काय म्हटले हे पाहणार. त्यानंतर कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबणार आहे...वकिलांशी सल्लामसलत करणार असल्याचेही त्यांनी म्हटले. निवडणुका सुरू आहेत. चर्चेचा केंद्रबिंदू बदलण्याचा प्रयत्न होतोय का अशी शंका उपस्थित करत ही चर्चा जाणीवपूर्वक होतोय का, असे असेल तर गंभीर असल्याचे म्हटले.
