चौकशीत काय समोर आले?
निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाने विमानातून एबी फॉर्म पाठवलेच नाही. खास विमानाने फक्त पक्षाचे पदाधिकारी आल्याचे चौकशीत समोर आले आहे. निवडणुकीसाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी एबी फॉर्म अनिवार्य असते. शिवसेना शिंदे गटाने आपल्या दोन उमेदवारांसाठी विमानाने एबी फॉर्म पाठवण्यात आले.
advertisement
सूत्रांच्या माहितीनुसार, एबी फॉर्म स्थानिक पक्ष कार्यालयात देखील उपलब्ध असतात. त्यामुळे या विमानातून फक्त पक्षाचे पदाधिकारी आले. एबी फॉर्म आणले गेले नाहीत. जिल्ह्यातील काही मतदारसंघांवर लक्ष ठेवण्यासाठी तातडीने या विमानातून पदाधिकारी आल्याची प्रशासनाच्या चौकशीत माहिती समोर आली आहे. पक्षाच्या कामकाजासाठी विमान वापरल्याने विमान खर्च देखील पक्षाकडेच राहील अशी माहिती सूत्रांनी दिली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विमानाने एबी फॉर्म आणल्याच्या घटनेमुळे या प्रकरणाची चौकशीला सुरुवात झाली होती.
काय आहे प्रकरण?
निवडणूक अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाने थेट चार्टर्ड प्लेनने देवळाली आणि दिंडोरी मतदारसंघासाठी आपले एबी फॉर्म पाठवल्याचे वृत्त समोर आले होते. देवळालीत राजश्री अहिरराव आणि दिंडोरीतून धनराज महाले यांनी शिंदे गटाच्यावतीने अर्ज दाखल करुन अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात बंडखोरीची भूमिका घेतली होती. खास विमानाने एबी फॉर्म पाठवल्याचे समोर आल्याने मोठी चर्चा सुरू झाली होती.
निवडणूक आयोगाने याची दखल घेतली होती. जिल्हा निवडणूक शाखेला याबाबत विचारणा करण्यात आली . अर्ज देण्यासाठी विमान कोणी आणले, त्यामध्ये कोण होते, कोणत्या उमेदवारांकरिता हे फॉर्म मागविण्यात आले व त्यासाठी किती खर्च आला, आदी मुद्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली.
