ठाकरेंचा अमितला पाठिंबा?
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या निवडणूक प्रचार दौऱ्याचे वेळापत्रक समोर आले आहे. माहीम मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि आदित्ये यांच्यापैकी कुणाचीही सभा नसल्याचे समोर आले. मुंबईत उद्धव ठाकरेंची मविआ नेत्यांसोबत पहिली जाहीर सभा ६ नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर 17 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 वाजता आणि 18 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता पुन्हा उद्धव ठाकरेंची सभा बीकेसी मैदानात होणार आहे. तर, आदित्य ठाकरेदेखील मुंबईत काही मतदारसंघात सभा घेणार आहेत. मात्र, माहीममध्ये कोणतीही सभा नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ठाकरे गटाकडून मनसेला पडद्यामागून मदत केलीय जातेय, का अशी चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
ठाकरेंचा गेमप्लान काय?
ठाकरे गटाने माहीमची निवडणूक गांभीर्याने घेतली असल्याचा एक मतप्रवाह आहे. शिवसेनेतील फुटीनंतर महेश सावंत यांची प्रभावी काम विभागात करून दाखवले. त्याच्या परिणामी शिंदेंच्या बंडानंतर संघटनात्मक मोठा फटका ठाकरे गटाला बसला नाही. महेश सावंत हे डार्क हॉर्स असल्याचेही राजकीय विश्लेषकांनी म्हटले. अमित ठाकरेंना पाठिंबा द्यायचा असता तर तो थेट दिला असता. मात्र, उमेदवार जाहीर करून ठाकरेंनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली असल्याचे संकेत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. ठाकरे गटाकडून आपल्या मतदारांपर्यंत पोहचण्यावर भर दिला जात आहे. शिवसेनेचे शाखा प्रमुख, गट प्रमुख यांच्यावर जबाबदारी सोपवली जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला जुने शिवसैनिकही सक्रिय होत आहेत. सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे अशी चर्चा सुरू असताना महेश सावंत यांनी आपल्या प्रचारावर भर दिला आहे.
आदित्यची सभा होणार?
ठाकरे गटाकडून मुंबईतील उमेदवारांसाठी एकच सभा घेतली जाणार आहे. प्रत्येक निवडणुकीत एक मोठी जाहीर सभा मुंबईतील उमेदवारांसाठी होते. तर, मतदारसंघात शिवसेनेचे नेते, लोकप्रतिनिधी सभांना संबोधित करतात. आदित्य ठाकरे यांची माहीममध्ये पुढील आठवड्यात सभा होण्याची शक्यता आहे. मात्र, या सभेत अमित ठाकरेंऐवजी विद्यमान आमदार सदा सरवणकर हेच आदित्य यांच्या निशाण्यावर असण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे यांच्यावर टीका न करण्याची भूमिका आदित्य घेऊ शकतात. यातून एकाच वेळी अनेक गोष्टींवर सूचकपणे ठाकरे गट भाष्य करू शकतो.
