बाळासाहेबांवर प्रेम असतं तर...
रविवारी, भाजपचा जाहिरनामा अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर बोलताना शाह यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शाह यांच्या टीकेनंतर आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर पलटवार करताना टीकास्त्र सोडले. राऊत यांनी म्हटले की, बाळासाहेबांवर आपलं इतकं प्रेम असतं तर बाळासाहेबांची शिवसेना आपण गैरमार्गाने फोडली नसती. बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष एक इंच शिवाय पुढे सरकत नाही. तुमच्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोक हे अधिक चांगली असल्याचेही त्यांनी म्हटले. या पक्षातील नेत्यांना बाळासाहेबांविषयी अत्यंत आदर आहे. तुमच्यासारखं ढोंगी प्रेम नसल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले. तुम्ही तुमच्या पोस्टर वरच्या व बॅनर वरचे बाळासाहेबांचे फोटो काढा लोक तुम्हाला महाराष्ट्रात उभा करणार नाही असेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्रात चिखल जो राजकीय चिखल झाला आहे, त्याला जबाबदार अमित शहा आहेत असेही त्यांनी म्हटले.
advertisement
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न का नाही?
स्वांतत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या का देत नाही असा सवाल करताना भारतरत्न देणं हे अमित शाहांच्या हातात असल्याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले. त्यांनी पुढे म्हटले की, कलम 370 हटवण्यात स्वतःची पाठ थोपटून घेऊ शकतात. 'मैंने हटाया मैंने हटाया' असे म्हणता, मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायला तुम्हाला कोणी अडवलं आहे असा सवाल ही त्यांनी केला. आजही कश्मीर मध्ये आपल्या जवानांच्या हत्या सुरू असल्याचे सांगत कलम 370 हटवून कश्मीरमध्ये आपण काय दिवे लावले आहेत, असा बोचरा वारही राऊतांनी केला.
सर्वेक्षण अंदाज चुकणार....
निवडणूकपूर्व सर्वेक्षणावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, जे सर्वे सध्या होत आहेत, त्यावर विश्वास ठेवावा अशी स्थिती नाही. लोकसभा निवडणुकीतही सर्वेक्षण समोर आणण्यात आले. त्यावेळी महायुतीला अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात वेगळे निकाल लागले असल्याचे त्यांनी म्हटले. आम्हाला 160 ते 165 जागा मिळणार आहेत. भाजपची लोक चोऱ्यामाऱ्या करून ज्या जागा जिंकतात तिथे आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सावध राहायला सांगितलं आहे. आता जे सरकार आहे चंद्रचूड कृपेने किंवा मोदी शहांच्या कृपेने बसलेले आहे ते पुन्हा निवडून येणार नाही आहे अशी खात्री आहे असेही राऊत यांनी म्हटले.
