अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा थोडक्यात पुढीलप्रमाणे.
सुनेत्रा पवार हे समाजकारण आणि राजकारणातील एक खंबीर नेतृत्व आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात 'काकी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनेत्रा पवार या केवळ एका राजकीय घराण्यातील सून नसून, त्यांनी स्वतःच्या कामातून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
सुनेत्रा पवार या मूळच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आहेत. त्यांचे वडील बाजीराव पाटील हे मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वातंत्र्य सैनिक होते. तसेच ते जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित प्रादेशिक नेते होते. आणि सुनेत्रा पवार यांचे भाऊ पद्मसिंह पाटील यांनीही महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची पदे भूषवली आहेत.त्यामुळे राजकारणाचे बाळकडू त्यांना माहेरूनच मिळाले होते. 1985 मध्ये त्यांचा विवाह ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झाला होता. या लग्नापासून त्यांना पार्थ आणि जय अशी दोन मुले आहेत.
advertisement
अर्थशास्त्राची पदवी (बी.कॉम.) घेतलेल्या सुनेत्रा पवार या शिक्षणासोबत तेव्हापासूनच अनेक कलागुणांत पारंगत होत्या. विशेषतः पेंटींग, संगीत, फोटोग्राफी आणि शेती हे त्यांचे विशेष आवडीचे विषय आहेत. त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटरमध्येही झाले आहे.
शेती आणि कौटुंबिक जबाबदारी
अजित पवार राजकारणात सक्रिय असताना, सुनेत्रा पवार यांनी बारामती आणि आसपासच्या परिसरातील सामाजिक कामांची धुरा सांभाळली.लग्नानंतर त्या काटेवाडीतील शेतीत रमल्या. प्रसंगी स्वतः शेतात राबायला सुरुवात केली. त्यांनी काटेवाडीची शेती स्वतःच्या घामाने फुलवली. केवळ शेतीच नाही तर आधीची दहा हजार पक्षांची पोल्ट्री त्यांनी एक लाखावर नेली. दादांनी सुरु केलेल्या शारदा दूध डेअरीत देखील लक्ष घालून दूध संकलन वाढवले. १९९१ मध्ये अजितदादा खासदार आणि त्यानंतर आमदार व मंत्री झाल्यावर संपूर्ण कौटुंबिक जबाबदारी सुनेत्रावहिनींनी समर्थपणे पार पाडली.
विद्या प्रतिष्ठानच्या उभारणीत त्या पहिल्यापासून सहभागी आहेत. पुढे त्या विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या व्यवस्थापन समितीच्या आणि सिनेट सदस्य झाल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत.
काटेवाडीचा कायापालट आणि ग्रामविकास: २००२ पर्यंत काटेवाडीत आरोग्याची स्थिती बिकट होती. सुनेत्रा पवार यांनी ग्रामविकासाची चळवळ सुरू करून काटेवाडीला निर्मलग्राम, यशवंतग्राम, तंटामुक्तग्राम, विमाग्राम, देशातील पहिले सायबरग्राम, कृषिग्राम आणि पर्यावरणग्राम बनवले. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर प्लँट आणि भूमिगत गटार योजना राबवणारी काटेवाडी पहिली ग्रामपंचायत ठरली.
२०१४ च्या जनधन योजनेच्या सात वर्षांपूर्वीच काटेवाडीत 'झीरो बॅलन्स' बँक खाती उघडली गेली.महिलांना संघटित करून घरांच्या दारावर महिलांच्या नावाच्या पाट्या लावल्या, ज्यामुळे महिलांना घराची 'मालकीन' केले.
एन्व्हायरो व्हिल (Environmental): पर्यावरणाबद्दल त्यांना विशेष ओढ आहे. त्यांनी बारामतीमध्ये पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि जलसंधारणाच्या कामात मोठे योगदान दिले आहे.तसेच बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.
सुनेत्रा पवार यांनी दीर्घकाळ पडद्यामागून अजित पवारांच्या निवडणूक प्रचाराचे आणि मतदारसंघाचे नियोजन केले आहे. मात्र, 2024 मध्ये त्यांचा सक्रिय राजकीय प्रवेश झाला.त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ही निवडणूक त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरली होती. सध्या त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत.
सुनेत्रा पवार या त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखल्या जातात.सार्वजनिक कार्यक्रमात त्या फारशा आक्रमक नसतात, मात्र संघटन कौशल्यात त्या अत्यंत निपुण आहेत.'अजित पवारांची खंबीर साथ' म्हणून त्यांची प्रतिमा असली,तरी आता त्या स्वतः एक स्वतंत्र राजकीय नेतृत्व म्हणून समोर येत आहेत.
विविध संस्था आणि उपक्रम:
रोजगार: बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून ६ हजार महिलांना रोजगार मिळाला.
पर्यावरण: बारामती तालुक्यात लाखो झाडे लावली आणि जलसंधारणाद्वारे लाखो लिटर पाणी अडवले.
आरोग्य: महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून लाखो रुग्णांना मोफत उपचार आणि शस्त्रक्रियांचा लाभ मिळवून दिला.
कृषी: 'महाराष्ट्र स्टेट अॅग्री अँड रुरल टुरिझम फेडरेशन' (मार्ट) ची स्थापना करून शेतकऱ्यांना नवीन संधी उपलब्ध करून दिल्या.
संसदीय कारकीर्द: सामाजिक क्षेत्रात ४० वर्षे काम केल्यानंतर त्या खासदार म्हणून राज्यसभेत दाखल झाल्या.
सभागृह संचालन: खासदारकीची पहिलीच टर्म असूनही त्यांची 'तालिका सभापती' पदी निवड झाली, जिथे त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सभागृहाचे संचालन केले.
महत्त्वाचे विषय: त्यांनी अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, मुळा-मुठा नदीचे प्रदूषण, शिक्षण, महिलांवरील हिंसाचार आणि कापड उद्योगातील अडचणी यांवर आवाज उठवला.
आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व: मेक्सिको येथील जागतिक महिला खासदार परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी महिलांवरील हिंसाचाराच्या विरोधात देशाची ठाम भूमिका मांडली
