विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडी घडत असताना अशा वेळी एकनाथ शिंदे त्यांच्या गावी जात असल्यानं महायुतीत आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडताना एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिकार पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना असल्याचं सांगितलं होतं. यानंतर दिल्लीत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर तिन्ही नेते महाराष्ट्रात परतले. दरम्यान, मुंबईत होणारी महायुतीच बैठक पुढे ढकलण्यात आलीय.
advertisement
विधानसभेच्या निकालाला आठवडा उलटल्यानंतरही अद्याप महायुतीच्या चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरूच आहे. दिल्लीत तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांनी अमित शहांची भेट घेतली तेव्हाचा फोटो समोर आला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत आहे. एकनाथ शिंदे यांची अमित शहांसोबत जवळपास २० मिनिटे बैठकही झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली. गेल्या अडीच वर्षात कोणतीही मागणी केली नाही पण कालच्या बैठकीत शिंदेंनी आपल्या मागण्या शहांसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
