मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका पार पाडणे आवश्यक आहे. त्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडीकडून सावध पावले उचलली जात असल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे महायुतीमध्येही स्वबळाची चाचपणी केली जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना भाजपकडून घेरण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा रंगली आहे.
advertisement
मुंबईत महायुतीचा महापौर बसवण्याची जोरदार गर्जना होत आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना शिंदे गटात सूर जुळताना दिसत नाही. त्यामुळेच स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दोन्ही पक्षांकडून मिळत आहेत. या स्वबळाच्या शक्तिप्रदर्शनात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही काही ठिकाणी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
आगामी निवडणुकीत ठाणे शहरातच एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, आता भाजपने फक्त ठाणे शहरातच नव्हे तर सगळ्या ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी आणि उल्हासनगर या सहा महापालिकांत सत्ता काबीज करण्यासाठी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र तयारी सुरू केली आहे. इच्छुकांची मोठी संख्या पाहता स्वबळावर लढण्याचा निर्णय न घेतल्यास कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका बसू शकतो, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
शिंदे गटासाठी ठाणे महत्त्वाचा बालेकिल्ला मानला जातो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक ठाण्यातून ताकद दाखवत आहेत. तर भाजपकडून गणेश नाईक आणि आमदार संजय केळकर यांनी मोर्चेबांधणी केली आहे. नाईकांच्या ठाण्यातील "जनता दरबार"ला प्रत्युत्तर म्हणून सरनाईक यांनी पालघरमध्ये, तर नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईत "जनता दरबार" सुरू करून शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.
नवी मुंबईवर गणेश नाईक यांचे प्राबल्य कायम आहे. तर, दुसरीकडे भाजप नेतृत्वाकडून नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यात समेट घडवण्यात येणार आहे. मंदा म्हात्रे यांचा सध्या नवी मुंबई भाजपात वरचष्मा आहे. नवी मुंबई भाजप अध्यक्ष पदाच्या निवडीतही त्यांच्या शब्दाला महत्त्व देण्यात आले. तर, दुसरीकडे नवी मुंबईतील पदाधिकार्यांकडूनही स्वबळाचा हट्ट धरण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबईतही भाजप विरुद्ध शिंदे गट अशी लढतही दिसण्याची शक्यता आहे.
मीरा-भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता सज्ज आहेत. मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. 95 जागा असणाऱ्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या मागील निवडणुकीत भाजपने एकट्याने बहुमताचा आकडा गाठला होता. तर, एकसंध असलेल्या शिवसेनेला 22 जागांवर विजय मिळाला होता.
कल्याण-डोंबिवली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे होमग्राउंड आहे. यंदा पहिल्यांदाच पॅनेल पद्धतीने मतदान होणार आहे. मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. निवडणूक निकालानंतर एकत्र आले. मात्र, भाजप आता आपली वाढलेली ताकद दाखवण्यासाठी उत्सुक असून अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी पुन्हा स्वबळ दिसू शकते. यामुळे पक्षाचा विस्तार होईल आणि नाराज कार्यकर्ते दुसऱ्या पक्षांकडे जाणार नाहीत, असा युक्तिवाद भाजप नेतृत्वाकडून केला जात आहे. तर, दुसरीकडे रविंद्र चव्हाण स्थानिक पातळीवर शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता. रविंद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड ही शिंदेच्या कोंडी असल्याची चर्चा रंगली होती.
उल्हासनगरमध्ये भाजपचा आमदार आहे. स्थानिक नेते पप्पू कलानी यांच्या गटासोबत त्यांचा राजकीय संघर्ष आहे. पप्पू कलानी यांचे सुपुत्र ओमी कलानी यांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढवली होती. काही दिवसांपूर्वीच ओमी कलानी यांनी शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतर आता इथंही स्वबळाची चाचपणी होण्याची शक्यता आहे.