महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रोडमॅप अखेर तयार होऊ लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया गतीमान झाली आहे. नगरविकास विभागाने सर्व महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींना प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात तीन टप्प्यात निवडणुका?
राज्यात या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याची प्राथमिक रूपरेषा सध्या तयार केली जात असून, ऑक्टोबरपासून मतदानाचा प्रारंभ होण्याची शक्यता असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
advertisement
प्रभाग रचना कधीपर्यंत पूर्ण होणार?
महापालिकांच्या प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा ऑक्टोबरपर्यंत, तर इतर स्थानिक संस्थांचा आराखडा ऑगस्टमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुका निश्चित होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येतील. त्यावर सुनावणी झाल्यानंतर प्रभागरचना अंतिम करण्यात येईल.
तीन टप्प्यात निवडणुका, महापालिकांसाठी मतदान कधी?
राज्य निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनांची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता एकाच वेळी सर्व निवडणुका घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात टप्प्याटप्प्याने निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात पंचायत समिती, नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये, आणि अखेरच्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्याचे संकेत मिळत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हा तिहेरी टप्पा आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करणार असल्याचे मानले जाते. विशेषतः विधानसभा निवडणुकांच्या नंतर राज्यातील या मिनी विधानसभा निवडणुका समजल्या जाणाऱ्या या स्थानिक निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत.