कारवाईची टांगती तलवार
निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पक्षातील विविध मंत्री आणि दिग्गज आमदारांवर प्रत्येक जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपवली होती. मात्र, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि कोल्हापूर यांसारखे काही बालेकिल्ले वगळता इतर अनेक ठिकाणी शिवसेनेला अपेक्षित यश मिळवता आले नाही. या खराब कामगिरीची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून, ज्या नेत्यांना आपले गड राखता आले नाहीत, त्यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार आहे.
advertisement
मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची दाट शक्यता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे अकार्यक्षम ठरलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीपूर्वीच त्यांनी सर्व मंत्र्यांना या संदर्भात कडक इशारा दिला होता. त्यामुळे ही मॅच आणि जिल्हा परिषदेची निवडणूक ही या मंत्र्यांसाठी एक प्रकारे 'लिटमस टेस्ट' मानली जात होती. या परीक्षेत जे नापास झाले आहेत, त्यांच्याकडून मंत्रिपद काढून घेऊन ते नवीन चेहऱ्यांना दिले जाऊ शकते.
मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये एकच चर्चा
जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत शिवसेना जरी दुसऱ्या क्रमांकावर राहिली असली, तरी सत्तेत असूनही पहिल्या क्रमांकापर्यंत पोहोचता न आल्याने मुख्यमंत्री नाराज आहेत. अकार्यक्षम नेत्यांना आता मंत्रिपदावरून हटवून त्यांच्यावर केवळ पक्ष बांधणीची जबाबदारी सोपवली जाण्याची चिन्हे आहेत. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा धाडसी निर्णय घेतला जाण्याची चर्चा सध्या मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये रंगली आहे.
राजकारणात 'गिअर' बदलण्याचे संकेत
मंत्रिमंडळातील या संभाव्य फेरबदलामुळे शिवसेनेत कोणाची खुर्ची जाणार आणि कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, निकालानंतर आता राज्याच्या राजकारणात 'गिअर' बदलण्याचे संकेत मिळत आहेत. शिंदेंचा हा 'सर्जिकल स्ट्राईक' पक्षाला भविष्यात किती फायदेशीर ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
