रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह सातारा घाट, कोल्हापूर घाट भागात ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनाही आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
advertisement
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात ११७.८ मी.मी. पाऊस झाला. या पावसामुळे मौजे हदगाव नखाते, येथील सात ते आठ नागरिक पुराच्या पाण्यात घराच्या छतावर अडकले असता आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. तसेच बाधित नागरिकांना सुखरूप स्थळी हलविण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजे बरडा येथे तीन व्यक्ती मंदिरात पुरामुळे अडकले असता स्थानिक बचाव पथकामार्फत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.