छत्रपती संभाजीनगर : 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले, आणि आज 23 नोव्हेंबरला मतमोजणी संपताच निकाल जाहीर झाला. छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्य मतदारसंघातून प्रदीप जयस्वाल यांनी 8119 मतांच्या आघाडीने विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयामुळे संपूर्ण मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे.
या निवडणुकीत जयस्वाल यांच्यासमोर एमआयएमचे नासीर आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब थोरात हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. मात्र, जयस्वाल यांनी दोघांनाही पराभूत करून आपला विजय नोंदवला. जयस्वाल यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळेच मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, असे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.
advertisement
"साहेबांचे चांगले काम विजयाचे खरे कारण"
जयस्वाल यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या मोठ्या भावाने सांगितले, "साहेबांनी अनेक चांगली कामे केली आहेत, त्यामुळेच जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. त्यांच्या विजयामुळे मला अत्यंत अभिमान वाटतो."
जयस्वाल यांच्या कामगिरीबाबत महिला कार्यकर्त्यांनीही आपला आनंद व्यक्त केला. "रस्त्यांची कामे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवणे आणि इतर मूलभूत सुविधा पुरवण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे. जनतेने त्यांच्या कामावर विश्वास ठेवला, यामुळेच त्यांना विजय मिळाला," असे महिला कार्यकर्त्यांनी सांगितले.
"लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने विजय"
सामान्य महिला मतदारही या विजयामुळे आनंदित आहेत. "आमच्या साहेबांना लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे. साहेबांनी गेल्या काही वर्षांत खूप चांगली कामे केली आहेत, त्यामुळे पुढील काळातही ते उत्तम काम करतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"साहेब एक नंबरचे नेते"
कार्यकर्त्यांनी देखील जयस्वाल यांचा उत्साहाने गौरव केला. "साहेब एक नंबरचे नेते आहेत, आणि त्यांच्या नावावरच जनता निवडणुकीत एक नंबरचे बटण दाबत होती," असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
जयस्वाल यांचा विजय त्यांच्या जनतेवरील कामगिरीचा पुरावा आहे. या विजयाने त्यांच्या समर्थकांचे मनोबल उंचावले असून, पुढील काळात ते अधिक चांगले काम करतील, अशी आशा व्यक्त होत आहे.