नाशिकच्या वादात तिसऱ्याची एन्ट्री...
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील जुना वाद आता आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही एन्ट्री घेतली आहे. ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या एन्ट्रीनं महायुतीमधील पालकमंत्री पदाच्या वादात ‘दोघात तिसरा, जुना वाद विसरा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
advertisement
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाच्या जबाबदारीवरून या वादाला अधिक उधाण आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रमासाठी झेंडावंदनाची जबाबदारी भाजपचे गिरीष महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर, गोंदिया जिल्ह्यातील झेंडावंदनासाठी छगन भुजबळ यांचं नाव जाहीर झालं आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तब्बल सात आमदार असतानाही, गोंदियाला का जायचं अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विश्वसनीय सूत्रांनी ‘न्यूज १८ लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, भुजबळ गोंदियाला जाणार नाहीत. त्यांच्या भूमिकेमुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेत राष्ट्रवादीचा स्पष्ट दावा अधिक ठळकपणे अधोरेखित झाला आहे. यानिमित्ताने भाजप-शिवसेनेतील जुना वाद विसरला जाऊन आता ‘नवा वाद’ पेटण्याची चिन्हं आहेत. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून दादा भुसे, भाजपचे गिरीश महाजन यांनी दावा केला आहे. आता, यामध्ये छगन भुजबळांनीदेखील दावा केला आहे.
रायगडवरही राष्ट्रवादीचा दावा...
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात चांगलीच रस्सीखेंच सुरू आहे. शिंदे गटाकडून भरत गोगावले आणि राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांचा दावा आहे. जिल्ह्यात आमचे आमदार अधिक आहे, त्यामुळे आम्हाला पालकमंत्री पदावर मिळायलं हवे अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण रायगडमध्ये अदिती तटकरे करणार आहेत. तर, ध्वजारोहण केल्याने पालकमंत्री होत नसल्याचे टोला गोगावले यांनी लगावला होता.