महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला? सत्तावाटपात भारतीय जनता पार्टी 'मोठा भाऊ'? अजितदादांच्या राष्ट्रवादीची मंत्रिपदं घटणार?
महायुतीचं सरकार स्थापनेपूर्वी तिन्ही पक्षात सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जातंय. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीतील प्रमुख तीन घटक पक्षांमध्ये सत्ता वाटप होणार आहे.
भाजपनं विधानसभेत जोरदार कामगिरी केली आहे. भाजपनं राज्यात 132 जागा जिंकल्या आहेत. त्या खालोखाल शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं 57 जागा मिळवल्या आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आले आहेत. हे संख्याबळ लक्षात घेऊन सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आलं आहे.
advertisement
कोणाला किती मंत्रिपदं?
भाजपच्या वाट्याला 25 मंत्रिपदं, शिंदेंच्या शिवसेनेला 10 मंत्रिपदं तर तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 7 मंत्रिपदं मिळणार असल्याचं बोललं जातंय. न्यूज १८ लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली.
राज्याच्या सत्तेत सर्वाधिक वाटा भाजपला मिळणार आहे. त्याखालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहेत. नुकतेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत सत्तावाटपाचं सूत्र ठरल्याचं बोललं जातंय.
गेल्या वेळी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समसमान सत्ता वाटप झालं होतं. प्रत्येक पक्षाला 9 मंत्रिपदं देण्यात आली होती. पण आता सत्ता वाटपाचं सूत्र बदललं आहे.त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंंत्रिपदावरील दावा सोडला
स्पष्ट बहुमत मिळूनही निकालानंतरच्या चौथ्या दिवशीही महायुतीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरत नसल्याने अंतर्गत कुरबुरींची माध्यमांत जोरदार चर्चा रंगली होती. एकनाथ शिंदे यांच्याकडून पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावे, यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू असल्याचेही बोलले गेले. गेली चार दिवस एकनाथ शिंदे माध्यमांपासून दूर होते. अखेर बुधवारी एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महायुतीने गेल्या अडीच वर्षात जनतेच्या हितासाठी काम केले त्यामुळे आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले. सरकार बनविण्यात आमचा कोणताही अडथळा असणार नाही, असे मोदी-शाह यांना फोन करून कळविल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्रिपदावर अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मोदी-शाह यांना असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. एकप्रकारे त्यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडत असल्याचे संकेत दिले.
