राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीची प्रतीक्षा आणि नापिकीच्या संकटात गढलेल्या ग्रामीण भागाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा कथित जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ आता राजकीय वर्तुळात वादग्रस्त ठरत आहे.
ऑनलाईन गेमिंगमुळे राज्यातील तरुणाई आणि शेतकरी कुटुंबांचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होत आहे. तरीही सरकारने यावर कारवाई का केली नाही, हे स्पष्ट होत आहे. मंत्रिमंडळातीलच काही सदस्य या गेमचे व्यसनी बनले आहेत, अशी घणाघाती टीका आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
advertisement
कैलास पाटील यांनी म्हटले की, मी लक्षवेधीच्या माध्यमातून ऑनलाईन गेमवर बंदी आणावी अशी सभागृहात मागणी केली होती. लाखो शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त होत असताना मुख्यमंत्री यांनी या गेम वर बंदी का नाही आणली हे आता मला कळत आहे. त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना याचे व्यसन लागले असल्याचे दिसून येत असल्याचे पाटील यांनी म्हटले.
सभागृहात शेतकरी कर्जमाफीचे वाट बघत आहे. तर, दुसरीकडे कृषी मंत्री ऑनलाइन रमीचा डाव रंगवत असल्यावरून राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा आणि पार्टी विथ डिफरन्स दाखवून द्यावे, असे आवाहन कैलास पाटील यांनी केले आहे.