मुंबईतील मराठा आंदोलनाच्या यशानंतरचा मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा नगद नारायण गडावर संपन्न झाला. नारायण गडाचे महंत, मराठा समाजातील आमदार खासदार, जरांगे पाटील यांच्यावर प्रेम करणारे हजारोंच्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्यात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची पुढची दिशा, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, अशा मुद्द्यांवर भाष्य करतानाच पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या वक्तव्यांना उत्तरे दिली.
advertisement
तिच्या पक्षातील मराठ्यांना खपाखप पाडा, म्हणजे त्यांना अक्कल येईल
आपल्याला गुलामीचे गॅझेट असे म्हणून काहींनी (पंकजा मुंडे) डिवचले. मग त्यांनाही इंग्रजांच्या जनगणनेनुसार आरक्षण मिळाले होते. इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? इंग्रज तुमच्या परिवारातला आहे का? लोकांच्या लेकरांना तुच्छ लेखायचे नाही. जातवान मराठ्यांनी तिच्या पक्षात कशाला काम करता रे? आपल्या लेकरांपेक्षा ती मोठी आहे का? कशाला तिचा प्रचार करायचा? झक मारायला आम्ही ३० वर्षे निवडून दिले. जातवान मराठ्यांनी तिच्या पक्षातून उभे राहू नका. जर उभे राहिलात तर मराठ्यांनी मराठा उमेदवारांना पाडा, म्हणजे यांना अक्कल येईल, असे जरांगे पाटील म्हणाले.
माजलेल्या लोकांना नीट करायची ताकद आमच्यात आहे
माजलेल्या लोकांना नीट करायची ताकद आमच्यात आहे. सगळ्यांनाच बोलता येते. भाजपमधून मराठे उभे राहिले की खपाखप पाडा. तेव्हा आपले नेते त्यांची हुजरेगिरी करायची बंद करतील. तेव्हा त्यांचे शीर्षस्थ नेतेही आपल्याशी नीट वागतील, असेही जरांगे पाटील म्हणाले.
आपल्या जातीचा अपमान केला तर त्याला झटका दाखवा
मराठ्यांच्या डोक्यातली दया मया जात नाही. एखाद्याने जर आपल्या जातीचा अपमान केला तर त्याला झटका दाखवायचा. आपली जातवान मराठ्यांची अस्सल अवलाद आहे. माझ्याजवळचे लोक फोडून त्याने मला पाडलं कसं, याचा विचार आपल्या प्रतिस्पर्ध्यांनी केला पाहिजे, असेही जरांगे पाटील म्हणाले.