मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक नेते मंडळी पुढे येत असून आमदार-खासदारही सहभागी होऊन भूमिका मांडत आहेत. त्यातच पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. सकल मराठा समाजास आरक्षण मिळणेकरीता महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी आमदार आवताडे यांनी केली आहे.राज्याचे विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून आरक्षणाच्या प्रश्नावर थेट भूमिका त्यांनी घेतली. राज्यात महायुतीचे सरकार असून आवताडे हे महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपचे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचे ते आमदार आहेत.
advertisement
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि कुणावरही अन्याय न करता. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे,याकरिता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून एकदिवसीय अधिवेशन घेण्याची मी मागणी करतो,असे समाधान आवताडे यांनी सांगितले आहे.मनोज जरांगे यांच्या मागण्या या सभागृहात मांडून त्या बहुमताने मान्य व्हाव्या अशी मागणी मी यानिमित्त करतो,असे समाधान आवताडे म्हणाले.
मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप
सरकारने मराठ्यांच्या शौचालयाची व्यवस्था केली, पण तीही कुलूप बंद होती. तसेच चहा आणि वडापावची जी दुकानं होती तेही बंद केली. त्यामुळे आमच्या पोरांना चहा पाणी मिळाला नाही, जेवायला मिळालं नाही. म्हणून आमची पोरं सीएसएमटी स्थानकात गेल्याचे मनोज जरांगे सांगतात. त्यामुळे तुम्ही इंग्रजापेक्षाही बेकार झालात अशी टीका जरांगे यांनी सरकारवर केली.
तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, गाड्या आम्ही रस्त्यावर लावणार नाही. सरकारने पण सहकार्य केलं आता आपणही सहकार्य केलं पाहिजे. दोन तासांमध्ये पोरांनी सगळ्या गाड्या ठरलेल्या ठिकाणी लावल्या आहेत,असे जरांगे यांनी सांगितलं.
तसेच आता फायनल फाईट होणार आहे, आरक्षण देणार नाहीतर मी जाणार... एक तर सरकार मला मारून टाकतील. नाहीतर उपोषण करून मी मरून जाईल. पण आता फायनल फाईट होणार आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी ठरवायचं आहे, आठमुठे पणा ठरवून निर्णय घ्यावा. मोदी आणि शहा यांनी डाग लावायचं की नाही ते ठरवायचं आहे. कारण, मराठा समाज हा महाराष्ट्राच चाक सुद्धा फिरू देणार नाही.