हैद्राबाद गॅझेटियरसंबंधी शासन निर्णय मिळाल्यानंतरचा जरांगे पाटील यांचा पहिलाच दसरा मेळावा नगद नारायण गडावर संपन्न झाला. या मेळाव्याला नारायण गडाचे महंत, मराठा समाजाचे नेते, आमदार खासदार तसेच हजारोंच्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता. सुरुवातीला काहीशा शांत स्वरात बोलणारे जरांगे पाटील यांचे भाषण उत्तरोत्तर आक्रमक होत गेले. मराठ्यांच्या मुलांनी शासक आणि प्रशासक बना, हा महत्त्वाचा सल्ला देतानाच येणाऱ्या काळातील सामाजिक आणि राजकीय वाटचालही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली.
advertisement
माजलेल्या लोकांना नीट करायची ताकद आमच्यात
जरांगे पाटील म्हणाले, काही जण निवडणुकीआधी आपल्याला डिवचतात. मग मी उत्तर दिले की तीन-चार महिने ते गप्प बसतात. आणि एकच शब्द काळजाला लागेल असे बोलतात. जसे की गुलामीचे गॅझेट म्हणणाऱ्या औलादी... इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या परिवारातला आहे का? लोकांच्या लेकरांना तुच्छ लेखायचं नाही. जातवान मराठ्यांनी तिच्या पक्षात कशाला काम करता? आपल्याला गुलाम म्हणणाऱ्यांचा प्रचार करायचा का? इंग्रजांनी जनगणना केली, तु्म्हाला त्यांनीच आरक्षण दिले, मग तुम्ही कोण? आम्ही तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही. आम्ही घाबरत नाही, शहाणपणा शिकवायचा नाही. माजलेल्या लोकांना नीट करायची ताकद आमच्यात आहे, अशा शब्दात त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर तोंडसुख घेतले.
भाजपमधील मराठा आमदार-खासदारांना जरांगे पाटील यांचे सवाल
तुम्ही राजस्थानला होता, तिकडे बादशाह अकबर होता, तिकडे तुम्हाला ठोकलं आणि मग तुम्ही इकडं आलात, असं आम्ही तुम्हाला म्हटलं का? व्यापारी म्हणून आलात आणि मग राज्यकर्ते बनलात.
लै बोलता येतं सगळ्यांना, झक मारायला तुम्हाला ३० वर्षे निवडून दिलं का.... त्यांच्या पक्षातून (भाजपमधून) मराठे उभे राहिले की खपाखप पाडा, तेव्हा हुजरेगिरी करायचे बंद करतील. तेव्हा ते आपल्याशी नीट वागतील. आपल्या लेकराबाळाला थेट गुलाम म्हटले गेले. तुम्हाला लेकराबाळापेक्षा ती मोठी आहे का... असे सवाल जरांगे पाटील भाजपमधील मराठा आमदार-खासदारांना विचारले.