मुंबई: मराठा आरक्षणासाठीच्या निर्णायक आंदोलनाचा टप्पा आता सुरू झाला आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलकांचा जथ्था बुधवारी सकाळी मुंबईच्या दिशेने निघाला. यामध्ये हजारो मराठा आंदोलक सहभागी झाले. मुंबईत मराठ्यांच्या आंदोलनाचे वादळ 29 ऑगस्ट रोजी धडकणार आहे. मात्र, आजपासून आझाद मैदानात मराठा आंदोलक मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement
मुंबईतूनच आता मराठा आरक्षणाचा गुलाल उधळणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. गरजवंत मराठ्यांच्या लढ्यात समाजाने उतरण्याची हाक जरांगे यांनी दिली. तीन दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मोर्चाची माहिती दिली होती. त्यानंतर बुधवारी हजारो मराठा बांधवांसह मनोज जरांगे यांनी शिवनेरी मार्गे मुंबईकडे कूच सुरू केली आहे. वाटेत त्यांचे मराठा समाजाकडून स्वागत करण्यात येत आहे.
कसा आहे मुंबई मोर्चाचा मार्ग?
अंतरवालीतून आंदोलकांनी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे कूच केली. हा मोर्चा शिवनेरी किल्ला, जुन्नर मार्गे माळशेज घाट कल्याणहून मुंबई येथे येणार होता. मात्र, घाटातील धोकादायक वळणामुळे या मार्गात बदल करण्यात आले. आता पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, मुंबईकडे जाणारा मार्ग हा पैठण, अहिल्या नगर, पांढरी फाटा, कल्याण फाटा नेप्ती चौक, आळे फाटा, नारायण गाव, किल्ले शिवनेरी येथे मुक्काम करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले. राजगुरु खेड मार्ग, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, चेंबूर या मार्गाने 28 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात दाखल होणार आहे. उपोषण आंदोलन हे 29 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.
आझाद मैदानात आंदोलक, जरांगे कधी पोहचणार?
मराठा आरक्षण आंदोलनसाठी मुंबईतील कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. मंडप उभारण्यात येत आहे. त्याशिवाय, वाहने पार्किंगचीदेखील व्यवस्था करण्यात येत आहे. आझाद मैदानात आता इतर जिल्ह्यातील आंदोलक पोहचले आहेत. तर, अनेक ठिकाणचे मराठा आंदोलक आझाद मैदानाच्या दिशेने निघाले आहेत.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार जरांगे पाटील हे आज रात्री मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे. मात्र, जुन्नरमधूनचे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निघाले. त्यामुळे ठिकठिकाणी लोकांचे अभिवादन स्वीकारत आता एवढं अंतर कापण्यास त्यांना बराच वेळ लागू शकतो. मनोज जरांगे हे मुंबईत मध्यरात्रीच्या सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे. रायगड, नवी मुंबईत जेवण आणि विश्रांतीसाठी वेळ वाढल्यास मध्यरात्रीनंतर जरांगे पाटील हे मराठा आंदोलकांसह आझाद मैदानात दाखल होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आझाद मैदानात उपोषण आंदोलन सुरू होणार आहे. त्यातच पोलिसांनी वेळेचेही बंधन घातले आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्याकडून वेळेवर आंदोलन सुरू होण्याची शक्यता आहे.