मीरा भाईंदरमध्ये डीसीपी राहुल चव्हाण आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत छठपूजेच्या अनुषंगाने काही सूचना आणि असलेल्या तयारींबाबत माहिती देण्यात आली. छठ पूजा बैठकीत मराठी भाषेत बोलण्याची मागणी केल्यावर आयपीएस असलेल्या राहुल चव्हाण यांनी संताप व्यक्त करत हिंदीतूनच मार्गदर्शन सुरू ठेवल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे प्रमोट पार्टे यांनी केले.
advertisement
>> नेमकं घडलं काय?
मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयात छठ पूजा आयोजनासंदर्भात मार्गदर्शन बैठक पार पडली. या बैठकीत मराठी एकीकरण समितीचे खजिनदार प्रमोद पार्टे यांनी नम्रपणे विनंती केली की, “मार्गदर्शन मराठीत द्यावे,” कारण महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे, असे सांगितले. मात्र या साध्या विनंतीवर DCP राहुल चव्हाण संतप्त झाले. त्यांनी प्रमोद पार्टे यांच्यावर आवाज चढवला. त्यांनी “तू गप्प खाली बस! मला कळते काय बोलायचं ते!” असं म्हणत त्यांनी संपूर्ण मार्गदर्शन हिंदी भाषेतच सुरू ठेवलं.
या घटनेनंतर उपस्थित नागरिकांमध्ये आणि मराठी प्रेमी संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.महाराष्ट्रातील अधिकृत भाषा मराठी असूनही, एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मराठीचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात मराठी एकीकरण समितीने DCP राहुल चव्हाण यांच्या विरोधात तक्रार पोलीस आयुक्त, मराठी भाषा विभाग आणि मानवाधिकार आयोगाकडे दाखल केली जाणार आहे.घटनेमुळे आता मीरा भाईंदर परिसरात “मराठीचा अपमान” हा वाद चांगलाच पेटला आहे. स्थानिक मराठी संघटनांनी यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, याआधी देखील मीरा-भाईंदरमध्ये मराठीच्या मुद्यावर रण पेटले होते. मराठी भाषेबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याने एका अमराठी व्यापाऱ्याला मनसैनिकांनी कानशिलात लगावली होती. त्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्याच्या प्रत्युत्तरात मराठी संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले होते.
