TRENDING:

Mhada : म्हाडा लवकरच घेणार मोठा निर्णय,लवकरच देणार भाड्याने घर

Last Updated:

म्हाडाची घरे, पुनर्विकासातून उपलब्ध झालेली घरे यांचा समावेश असणार आहे. यात म्हाडाच्या भाडेतत्त्वावरील घरांचा समावेश असणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी म्हाडा एकीकडे गृहनिर्मिती करीत आहे. दुसरीकडे खासगी विकासकही मोठ्या संख्येने घरांची निर्मिती करीत आहेत. मात्र खासगी विकासकांची घरे खूप महाग आहेत. तसेच ते मोठ्या प्रमाणावर पंचतारांकित सुविधा असलेले महागडे प्रकल्प उभारत आहेत. ही घरे सर्वसामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे अत्यल्प, अल्प गटाला म्हाडावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळेच म्हाडाच्या सोडतीत नेहमीच अत्यल्प आणि अल्प गटातील घरांना मोठी मागणी आहे. मात्र अनेकांना आर्थिक वा इतर अडचणींमुळे म्हाडाचे घरही परवडत नाही. त्यामुळेच म्हाडाने घरांच्या विक्रीसह भाडेतत्त्वावरील घरांचीही निर्मिती करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून जोर धरू लागली होती.यासाठी म्हाडाने आता पुढाकार घेतला आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून विकसित होत असल्याने देशभरातून नव्हे तर परदेशातूनही अनेक जण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत येत आहेत. काही जण शिक्षणासाठी वा इतर कामासाठी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात येतात. या मंडळींकडून मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे भाड्याच्या घराला मागणी वाढत आहे. मात्र मुंबई आणि मुंबई महागनर प्रदेशात सरकारी यंत्रणेकडून भाडेतत्त्वावरील घरांची निर्मिती केली जात नसल्याने त्यांना दलालांच्या माध्यमातून खासगी घरे भाड्याने घ्यावी लागतात किंवा हॉटेलमध्ये रहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन सरकारी यंत्रणेकडून भाडेतत्त्वावरील गृहनिर्मिती करण्याची मागणी होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त आणि चांगली भाड्याची घरे उपलब्ध होत नसल्याने झोपड्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी भाडेतत्त्वावरील घरांची गरज आहे.

advertisement

म्हाडा बांधणार भाड्याची घरे

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डाॅलर्सवर नेण्याचा संकल्प केंद्र सरकारने सोडला आहे. या संकल्पपूर्तीसाठी निती आयोगाच्या शिफारशीनुसार चार महानगरांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र अर्थात ग्रोथ हब म्हणून प्रायोगिक तत्त्वावर विकास करण्यात येणार आहे. यापैकी एक ग्रोथ हब म्हणजे मुंबई महानगर प्रदेश अर्थात एमएमआर. एमएमआर ग्रोथ हबची संपूर्ण जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) टाकण्यात आली आहे. एमएमआरडीएने यासाठी आराखडा तयार करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. त्याचवेळी या ग्रोथ हबमध्ये 2047 पर्यंत 30 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट निती आयोगाने दिले आहे. यातील चार लाख घरांची जबाबदारी म्हाडावर सोपविण्यात आली असून ही घरे 2030 पर्यंत बांधून पूर्ण करायची आहेत. म्हाडा आणि खासगी विकासक ही गृहनिर्मिती करणार आहेत. मात्र हे उद्दिष्ट गाठण्यासाठी म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे म्हाडाने चार लाखांऐवजी आठ लाख घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवत यासाठीचा आराखडा तयार केला आहे. या आठ लाख घरांमध्ये विकासकांकडून बांधण्यात आलेली घरे, म्हाडाची घरे, पुनर्विकासातून उपलब्ध झालेली घरे यांचा समावेश असणार आहे. यात म्हाडाच्या भाडेतत्त्वावरील घरांचा समावेश असणार आहे.

advertisement

म्हाडाच्या प्रकल्पातील काही घरे भाडेतत्त्वावर राखीव?

एमएमआरचा विकास ग्रोथ हब म्हणून केला जाणार आहे. त्यामुळे साहजिकच भविष्यात येथे मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यातून, देशातून आणि परदेशातून नागरिक रोजगारासाठी येथे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रोथ हबमध्ये नोकरी वा इतर कारणांसाठी येणाऱ्यांना निवारा देण्यासाठी भाडेतत्त्वावरील घराची निर्मिती करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गट अशा सर्व वर्गातील नागरिकांसाठी भाड्याची घरे बांधण्यात येणार आहेत. म्हाडाच्या मुंबई महानगर प्रदेशातील प्रकल्पातील काही घरे यापुढे भाड्याची घरे म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहेत. अत्यल्प आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरे राखीव ठेवली जाणार आहेत. एमएमआर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी या गटाला भाडेतत्त्वावरील घरांच्या प्रकल्पात प्राधान्य असणार आहे. तर उच्च गटासाठी त्यांना आवश्यक सर्व सुविधा अर्थात पंचतारांकित सुविधा असलेली भाड्याची घरे येत्या काळात उपलब्ध करण्यात येणार आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mhada : म्हाडा लवकरच घेणार मोठा निर्णय,लवकरच देणार भाड्याने घर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल