एमआयएम पक्षाची संभाजीनगर शहरातील काही भागांत चांगली ताकद आहे. एमआयएमचे तिकीट मिळावे, यासाठी यंदा अनेकांनी फिल्डिंग लावली होती. मात्र इम्तियाज जलील यांनी केलेल्या तिकीटवाटपात अनेकांची तिकीटे कापली. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी जलील यांना जाब विचारला. गेल्या १५ दिवसांपासून याच मुद्द्यावरून पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड धुसफूस सुरू आहे. याच रागातून नाराजांनी हे कृत्य केल्याचे बोलले जाते.
advertisement
इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला का झाला? तिकीट वाटपावरून राडा!
संभाजीनगर महापालिका निवडणुकीत २०१७ साली एमआयएमचे २५ नगरसेवक निवडून आले. त्यापैकी विद्यमान २२ नगरसेवकांची तिकीटे यंदा इम्तियाज जलील यांनी कापली. यावेळी प्रस्थापितांना बाजूला सारून जलील यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. नाराज झालेल्या नगरसेवकांनी बंडाचे निशाणा फडकावले. सहा नगरसेवकांनी इतर पक्षांत जाऊन तिकीट मिळवले. उर्वरित १७ जण पक्षावर प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी जलील यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.
इम्तियाज जलील यांना स्थानिक पातळीवर मोठा विरोध, कार अडवून मारहाण
इम्तियाज जलील यांना स्थानिक पातळीवर मोठा विरोध होत होता. स्थानिक नाराज नगरसेवक जलील यांच्याविरोधात अतिशय आक्रमक झाले होते. तरीही आम्ही विविध प्रभागांत जाऊन आमचे काम करू, प्रचार करू, असा पवित्रा इम्तियाज जलील यांनी घेतला. बुधवारी सकाळी पक्षांतर्गत विरोधकांनी इशारा देऊनही जलील विविध ठिकाणी प्रचारासाठी गेले. दुपारच्या वेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी जलील यांच्यावर हल्ला चढवला. जलील कारमधून जात असताना काहींनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. जलील गाडीत असल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही, परंतु विरोधक थेटपणे त्यांच्या दिशेने चालून गेल्याने मोठा गोंधळ उडाला.
उघडलेल्या घटनेने घटनास्थळी शेकडोंचा जमाव जमला. काहींनी फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी देखील ५ ते १० मिनिटांत घटनास्थळी येऊन जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला.
इम्तियाज जलील यांनी स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून हल्ला करवून घेतला- विरोधकांचा आरोप
इम्तियाज जलील यांना मारहाण झाली, यात आमचा काहीही दोष नाही. आमच्या लोकांनी मारहाण केली नाही. त्यांनी काही लोक स्वत:च आणले होते. त्यांच्याच माणसांनी हल्ला केला, वातावरण निर्मिती करण्यासाठी हा हल्ला करवून घेतला, असा आमचा आरोप आहे, असे विरोधी गटाने सांगितले. त्यांच्या उमेदवारांची राजकीय वर्तुळात कुठेही चर्चा नव्हती. ज्यांनी तिकीटासाठी पैसे घेतले त्यांनी आश्वासने देऊन तिकीट देखील दिली नाही, याचे पुरावे आमच्याकडे असल्याचा गंभीर आरोपही जलील यांच्या विरोधकांनी केला.
