पुणे : पुण्यातील शिरूर हवेली मतदारसंघातील आमदार अशोक पवार यांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. आमदार पुत्राचं अपहरण करून, मारहाण आणि खंडणी प्रकरणी चौंघांवर शिरूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रात्री उशिरा शिरूर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं. आऱोपींमध्ये भाऊ कोळपे ( रा. माडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे) व दोन अनोळखी पुरुष व एक महिला आहेत.
advertisement
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरूर हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. त्याला जबरीने विवस्त्र करून एका महिलेसोबत आणून त्या महिलेला विवस्त्र करून फोटो काढण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं सर्व प्रकार घडला. आमदार अशोक पवार यांच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली होती. ऋषीराज पवार असे आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे नाव आहे. ऋषीराज पवार हा घोडगंगा साखर कारखाण्याचा चेअरमन सुद्धा आहे.
काहीजण आपल्या पक्षात प्रवेश करणार आहेत असं सांगून आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषीराजला भाऊ कोळपेसह इतर दोन अनोळखी लोक घेऊन गेले. दुचाकीवरून ऋषीराजला एका बंगल्यात नेलं. तिथं बेडरूममध्ये डांबून ठेवलं आणि मारहाण करण्यात आली. तसंच गळा आवळून त्याला कपडे काढायला लावले. तेव्हा एका अनोळखी महिलेला बोलावून तिलाही विवस्त्र करण्यात आलं. तिच्यासोबत अश्लील कृत्य करायला लावून त्याचा व्हिडीओ शूट केला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत १० कोटींची खंडणी मागण्यात आली.
