आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा बीकेसी परिसरातील सायकल ट्रॅक आता उखडण्यात येणार आहे. त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण आणि एकेरी वाहतूक व्यवस्था राबवणार येणार आहे. यासाठी MMRDA लवकरच कंत्राटदार देखील नेमणार आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला सायकल ट्रॅक उखडण्यासाठी 25 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
कारण काय?
advertisement
वांद्रे-कुर्ला संकुलातील वाढत्या वाहतुकीच्या अडचणीवर मात करण्यासाठी होणार रस्ता रुंदीकरण आणि एकेरी वाहतूक व्यवस्था राबवण्यात येणार आहे. सध्या शीव (सायन) पूल बंद असल्यामुळे बहुतांश वाहतूक वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात वळवण्यात आली आहे. बीकेसीतील कमी प्रमाणात वापरात असलेला सायकल ट्रॅक मार्गिकेत रूपांतरित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढेल. परिणामी, प्रत्येक मार्गिकेची वाहतूक क्षमता 600–900 वाहनांनी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
फायदा काय होणार?
सायकल ट्रॅक काढल्याने रस्त्याचे रुंदीकरण 50 टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे 2+2 मार्गिका ही 3+3 मार्गिका होणार आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेतील प्रवासाचा कालावधी 25 मिनिटांवरून 15 मिनिटांपर्यंत कमी होईल या 10 मिनिटांमुळे प्रवासी वेळेत 40 टक्के बचत होणार असल्याचा दावा आहे.
बीकेसीत तब्बल 10.8 किमी पदपथ आहेत. त्याला लागूनच 9.9 किमी लांबीचे सायकल ट्रॅकही उभारण्यात आले आहेत. यातील पदपथांची रुंदी 4 ते 7 मीटरपर्यंत, तर सायकल ट्रॅक 1.5 ते 2.7 मीटर रुंदीचे आहेत. मात्र, दरदिवशी बीकेसीत कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या 6 लाखांवर पोहोचल्याने गर्दीच्या वेळेत येथे वाहतूक कोंडी होत आहे.