तेलखेडी येथील मीनाबाई सचिन पावरा होळीनिमित्त गुरुवारी दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन माहेरी सूर्यपूर येथे आल्या होत्या. उन्हाच्या तडाख्याचा लहान मोठ्यांना त्रास होत असताना बाळालाही त्रास होऊ लागला. बाळाला उलट्या सुरू झाल्या. काही वेळे उलट्यानंतर बाळाची अचानक हालचाल थांबली. बाळाने मान टाकली, असे समजून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही तासांपूर्वी बाळाचे कौतुक आणि काळजी घेणारं कुटुंब शोकसागरात बुडालं. जड अंतःकरणाने बाळाच्या अंत्यविधीला सुरुवात झाली.
advertisement
अन् डॉक्टर ठरले देवदूत...
कुटुंबातील नातेवाइकांनी आरोग्य केंद्रातील डॉ. गणेश तडवी यांच्या कानावर ही माहिती दिली. डॉ. तडवी घरी आले. बाळाला तपासले आणि , बाळाला रुग्णालयात घेऊन जावे लागेल असे सांगितले. मात्र, कुटुंब बाळाच्या अखेरच्या प्रवासाला लागले. ते बाळाला गावी घेऊन जात होते. अखेर डॉक्टरांनी आपला अनुभव पणाला लावत तेथेच बाळावर उपचार सुरू केले. त्यांनी बाळाच्या पायाला टिचक्या मारल्या आणि बाळाने श्वासोच्छवास घेण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी बाळाला एक दिवस आरोग्य केंद्रात उपचारासाठी ठेवले. बाळ आता सुखरुप असल्याचे त्यांनी डॉ. तडवी यांनी सांगितले.
बाळाला नेमका कसला त्रास झाला?
बाळाचा मृत्यू झाला, अशीच धारणा कुटुंबाची झाली होती. मात्र, डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नाने बाळाला जीवदान मिळाले. शहादा येथील खासगी रुग्णालयात बाळाला दाखल केले आहेत. सध्या न्युमोनियाची साथ सुरू आहे. बाळाच्या आईला दूध कमी येत असल्याने सोडियम आणि कॅल्शियमची मात्रा कमी झाल्यामुळे बाळाला त्रास झाला होता अशी माहिती समोर आली आहे.