धक्कादायक बाब म्हणजे या योजनेअंतर्ग महाराष्ट्रातील लाडक्या आजीबाईंनी तर सरकारचा खजिना लुटल्याचं समोर आलं आहे. या महिलांनी सरकारचे तब्बल ४३१ कोटी ७० लाख एवढी रक्कम सरकारच्या नाकाखालून ढापली आहे. खरं तर, सध्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्या लाभार्थ्यांची छाननी केली जात आहे. अर्जांची छाननी केली जात असताना तब्बल १४ हजार २९८ पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. सरकारकडून मागील दहा महिन्यांत या लाडक्या पुरुषांना २१.४४ कोटी रुपयांचे वाटपही करण्यात आले. योजनेच्या लाभार्थींच्या छाननीत हा प्रकार उघड झाला आहे. आता याबाबत विविध प्रश्न निर्माण होतं आहे.
advertisement
पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार ताजा असताना आता महाराष्ट्रातील लाडक्या आजीबाईंनी देखील संधीचं सोनं केल्याचं समोर आलं आहे. ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत, असं असताना देखील ६५ वर्षे वयावरील २ लाख ८७ हजार ८०३ वयोवृद्ध महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं आकडेवारीमधून निदर्शनास आलं आहे. सरकारने मागील १० महिन्यांत या महिलांच्या खात्यात तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपये जमा केले. त्यामुळे एकप्रकारे या महिलांनी सरकारच्या खजिन्यावर डल्ला मारल्याचं बोललं जातंय.
खरं तर, ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांसाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडून विविध मोफत योजना राबवल्या जातात. त्यामुळे 65 वयावरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, असा नियम आहे. असं असताना राज्यातील तब्बल २ लाख ८७ हजार ८०३ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. आता हे लाभार्थी गाळले जातील, त्यामुळे सरकारचे वर्षाकाठी ५१८ कोटी रुपये वाचणार आहेत.