विजय देसाई, प्रतिनिधी, वसई-विरार: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका दररोज प्रवाशांना बसत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने काहींना प्राण गमवावे लागल्याची घटना समोर आली. आता हा मुंबई-अहमदाबाद महामार्ग वाहतूक कोंडीचा अड्डा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता या वाहतूक कोंडीची संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील दादरमधील शारदाश्रम शाळेचे विद्यार्थी सहलीसाठी आले होते. या शाळेची बस तब्बल 12 तास वाहतूक कोंडी मध्ये अडकून राहावं लागलं. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. या सगळ्या प्रकाराची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना फोन केले. शारदाश्रम शाळेसह मालाड- मालवणी येथील शाळेच्या मुलांची बस वाहतूक कोंडीत अडकली होती. या दोन्ही शाळांचे जवळपास 500 विद्यार्थी वाहतूक कोंडीत अडकले होते.
advertisement
मुंबईच्या दादर येथील शारदाश्रम शाळेचे आठवी ते दहावीचे विद्यार्थी विरारच्या रिसॉर्ट मध्ये सहलीसाठी आले होते. सहलीचा आनंद घेतल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास परतीच्या प्रवासासाठी निघाले. मात्र, तब्बल 12 तास वाहतूक कोंडीत अडकून पडले. वाहतूक कोंडीमुळे अनेक विद्यार्थी भुकेलेले होते. त्यांना स्थानिक लोकांनी मदत करून ढाब्यावर जेवणाची व्यवस्था केली. आज पहाटे सहा सव्वा सहाच्या सुमारास सर्व विद्यार्थी सुखरूप दादरला पोहोचलेत. दरम्यान, शाळेची मुले वाहतूक कोंडीत अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रशासनाला फोन करून मुलांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यास सांगितले. मुलांची काळजी घेण्यासही त्यांनी सांगितले.
या वाहतूक कोंडीने अनेकांचे जीव घेतल्या असून प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. सध्या या मार्गावर अवजड वाहनांना बंदी असल्याचा परिपत्रक पोलिसांनी जाहीर केलं होते. मात्र ते परिपत्रक कागदावरच राहिल्याचं या वाहतूक कोंडीमुळे समोर आले आहे. नियमांचे उल्लंघन होत असताना त्याकडे डोळेझाक करणाऱ्या कामचुकार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.