अवघ्या काही दिवसांवरच गणोशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे चाकरमानी सध्या मोठ्या प्रमाणावर कोकणात जाताना दिसत आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जात असल्यामुळे सरकारने वाहतूक कोंडी किंवा अपघाताची शक्यता टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी घातली आहे. परंतू, जयगड बंदर आणि जेएनपीटी बंदर येथून आयात निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, औषधं, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला, नाशवंत माल, या जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना नियम लागू नाही. यासाठी वाहन चालकांना महामार्ग विभागाकडून प्रवेशपत्र घेणं सक्तीचं असणार आहे.
advertisement
महामार्गावरील बंदी कशी असणार ?
मुंबई- गोवा महामार्गावर अवजड वाहनांना २३ ते २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, २ सप्टेंबरला दिवसभर आणि ६- ७ सप्टेंबर या कालावधीत बंदी असणार आहे. तीन टप्प्यांमध्ये सरकारने आजपासून बंदी घातली आहे. २३ ऑगस्टपासून मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २८ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत मुंबई- गोवा महामार्गावरून अवजड वाहतूक बंद राहणार आहे. ५ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन ३१ तारखेला होणार आहेत. त्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना वाहतूकीसाठी बंदी राहणार आहे. तर, ७ दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन २ सप्टेंबरला होणार आहेत. त्यादिवशी देखील सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. तर, ६ सप्टेंबर २०२५ पासून सकाळी ८ वाजल्यापासून ते ७ सप्टेंबर २०२५ पर्यंत रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी राहील.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावर अपघात झाल्यास वाहने तात्काळ बाजूला करण्यासाठी केन्स आणि वाहन दुरूस्ती पथकही तैनात करण्यात आले आहेत. अवजड वाहने बंदीच्या काळात त्यांना रोखण्यासाठी रत्नागिरी आरटीओची पथके तैनात करण्यात आली आहे. या पथकाची कशेडी घाटापासून खारेपाटणपर्यंत २४ तास गस्त असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई- गोवा महामार्गाचं काम केव्हा पूर्ण होणार ? तात्पुरत्यापद्धतीने होणाऱ्या रस्त्यांच्या कामाला केव्हा ब्रेक मिळणार ? कोकणकरांचा प्रवास केव्हा खड्डेमुक्त होणार असे अनेक प्रश्न चाकरमान्यांकडून सरकारला विचारला जात आहे.
