मुंबई : 7 जुलैचा पूर्ण रविवार उकाड्यात घालवल्यानंतर रात्री जरा गारवा मिळाला. मुंबईकर, ठाणेकर गाढ झोपेत असताना त्यांच्या परिसराला पावसानं झोडपलं. पावसामुळे सकाळ अल्हाददायक झाली. मात्र घराबाहेर पडताच पावसाचा फटका बसला. रात्रभर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूककोंडी झाली, अनेक भागात ट्रॅकवर पाणी आल्यानं लोकल गाड्यांचाही खोळंबा झाला. गाड्या उशिरानं धावल्यामुळे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.
advertisement
रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यानंतर सकाळीसुद्धा पावसाचा जोर कायम राहिल्यानं शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. शिवाय नागरिकांना गरज असेल तरच बाहेर पडा, असं आवाहन करण्यात आलं.
हेही वाचा : आधीच हौस, त्यात पडला पाऊस! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलचा खोळंबा
मुंबईतील काही भागांमध्ये मध्यरात्री 1 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत 300 मीमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. याचा फटका मुंबईकरांना बसलाच, शिवाय उपनगरातून येणाऱ्या चाकरमान्यांचेही हाल झाले.
मुंबईला ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसई-विरार, पालघरहून दररोज हजारो प्रवासी कामानिमित्त येतात. रस्त्यांवर वाहतूककोंडी झाल्यानं आणि लोकलच्या तीनही मार्गांवरील गाड्या उशिरानं धावल्यामुळे बससाठी मोठीच्या मोठी रांग पाहायला मिळाली, शिवाय स्टेशनवर भरपूर गर्दी झाली होती. एकंदरीत, पावसामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आणि प्रवाशांना हाल सोसावे लागले.