‘मेट्रो 2 बी’ अंतर्गत अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द या मार्गिकेतील डायमंड गार्डन–मंडाले दरम्यानचा 5.3 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्याकडून तात्पुरते सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. तर अंतिम प्रमाणपत्र लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी तांत्रिक अडचणी आणि त्यानंतर पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लोकार्पण रखडले होते.
advertisement
Atal Setu Coastal Road: अटल सेतू, कोस्टल रोड थेट विमानतळाला जोडणार, सिडकोचा मास्टर प्लॅन
‘मेट्रो 9’ अंतर्गत दहिसर–मिरारोड मार्गिकेतील दहिसर काशीगाव हा पहिला टप्पाही अंतिम टप्प्यात आहे. या मार्गिकेच्या सीएमआरएस चाचण्या सध्या अंतिम अवस्थेत असून येत्या आठवडाभरात सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रवासाचा वेळ वाचणार
डायमंड गार्डन–मंडाले हा टप्पा सुरू झाल्यास, ही पूर्व उपनगरातील पहिली मेट्रो सेवा ठरेल तसेच मुंबईतील सेवेत दाखल होणारी पाचवी मेट्रो मार्गिका असेल. या मेट्रोमुळे मंडाले ते डायमंड गार्डनदरम्यानचा प्रवास काही मिनिटांत शक्य होणार आहे. दुसरीकडे दहिसर-काशीगाव हा टप्पा कार्यान्वित झाल्यास ही मुंबईतील सहावी तर मुंबई महानगर प्रदेशातील पहिली मेट्रो सेवा ठरेल ज्यामुळे दहिसर ते काशीगाव प्रवास अतिशय जलद होईल.
दरम्यान, 26 जानेवारी रोजी लोकार्पण होण्याची चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी हे दावोस दौऱ्यावर असल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लोकार्पणाचा मुहूर्त ठरेल असेही संकेत मिळत आहेत. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दोन्ही मार्गिकांचे लोकार्पण एकाच दिवशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






