मुंबई : लोकलची गर्दी आणि वाहतुकीतील कोंडीला पर्याय म्हणून मुंबईकरांना मोठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाने मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाण्याहून थेट कुलाब्यातील गेट वे ऑफ इंडिया गाठता येणार आहे. या प्रवासासाठीची लोकलची कटकट संपणार आहे. आणिक डेपो–वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका-11 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 23 हजार 487 कोटी 51 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा हजारो प्रवाशांना होणार आहे.
advertisement
बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने या प्रकल्पावर शिक्कामोर्तब केले. ही मार्गिका प्रत्यक्षात वडाळा–ठाणे–कासारवाडवली मेट्रो मार्गिकेचा विस्तार आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने तयार केला आहे. या कामाची जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) कडे देण्यात आली आहे.
17.51 किमी लांबीचा प्रकल्प, 70 टक्के भाग भुमिगत..
वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गिकेतील बहुतांश म्हणजेच 70 टक्के भाग भुमिगत असणार आहे . यात 13 भूमिगत आणि 1 भू-समतल स्थानक उभारण्यात येणार आहेत. यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहेत वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया जोडणी अधिक वेगवान होणार आहे.
जोडली जाणारी ठिकाणे
या मार्गिकेमुळे आणिक आगर, वडाळा ट्रक टर्मिनल, सीजीएस कॉलनी, गणेश नगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी, वाडी बंदर, दारुखाना, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, हॉर्निमन सर्कल आणि गेटवे ऑफ इंडिया ही महत्त्वाची ठिकाणे थेट मेट्रोशी जोडली जाणार आहेत.
निधी आणि केंद्राकडून मदत
प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे 3137.72 कोटी रुपये समभाग (equity) आणि 916.74 कोटी रुपये बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य मिळवण्यासाठी विनंती केली जाणार आहे. उर्वरित निधी कर्ज स्वरूपात उभारण्यात येणार असून, त्याची परतफेड राज्य सरकारकडून केली जाणार आहे.