मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग) श्री. अविनाश काटे यांच्या देखीरेखीत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये स्वच्छ इंधनावर बेकरी तसेच स्मशानभूमीचे क्रियान्वयन, सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक पर्यावरणस्नेही बनविण्यासाठी इलेक्ट्रिक बसेसचा वापर, बांधकामाच्या राडारोड्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प, धूळ आटोक्यात आणण्यासाठी मिस्टींग मशीनच्या सहाय्याने रस्त्यांवर पाणी फवारणी यासह विविध उपाययोजनांचा समावेश आहे.
advertisement
सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली
वायू प्रदूषण नियंत्रणासाठी दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने २८ मुद्यांचा समावेश असलेली सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये बांधकाम प्रकल्पाच्या सभोवताली धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पत्र्यांचे कुंपण उभारणे, हिरव्या कपड्याचे आच्छादन करणे, पाणी फवारणी करणे, राडारोड्याची शास्त्रोक्तरित्या साठवण व ने-आण करणे, बांधकामाच्या ठिकाणी वायू प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा बसवणे, धूरशोषक यंत्र बसवणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.
‘कामे थांबवा’ नोटीस बजावण्यात आल्या आहेत
तथापि, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटकोरपणे पालन होत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेकडून सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात वायू प्रदूषणात वाढ निदर्शनास आल्यानंतर वायू प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी या पथकाच्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण ५३ बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘जी दक्षिण’ विभागातील सिद्धार्थ नगर परिसरातील १७, ‘ई’ विभागातील माझगाव परिसरातील ५, ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पश्चिम) परिसरातील ३१ बांधकामांचा समावेश आहे.
९५ भरारी पथकांच्या माध्यमांतून कारवाई होणार
दरम्यान, बांधकामाच्या ठिकाणी संवेदक (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणाऱ्या संयंत्रांच्या सद्यस्थितीबाबत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी आज (दिनांक २७ नोव्हेंबर २०२५) आढावा घेतला. मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी ६६२ संवेदक (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारे संयंत्र बसविण्यात आले आहेत. तर, २५१ संयंत्र प्रस्थापित करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. एकूण ४०० संयंत्रे ही एकत्रित माहिती संकलनाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या डॅशबोर्डशी संलंग्नित करण्यात आली आहेत. यापैकी, ११७ संयंत्रे सक्रिय नसल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे, कोणतेही संयंत्र सक्रिय नसल्याचे आढळून आल्यास विभाग (वॉर्ड) स्तरावर नेमण्यात आलेल्या एकूण ९५ भरारी पथकांच्या माध्यमांतून संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला आहे .
बेकरी हेसुद्धा वायू प्रदूषणास कारक घटकांपैकी एक आहेत. मुंबईतील एकूण ५९३ बेकरींपैकी २०९ बेकऱ्या स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या होत्या. महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे ५७ बेकऱ्या स्वच्छ इंधनावर परावर्तित झाल्या आहेत. तर, मागील सहा महिन्यात ७५ बेकऱ्यांनी या परिवर्तनासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच, ८८ बेकऱ्यांनी महानगर गॅस मिळण्यासाठी अर्ज केला आहे.
वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाई सुरूच राहील. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बांधकाम व्यावसायिकांनी वायू प्रदूषणास कारणीभूत ठरेल, असे कोणतेही कृत्य करू नये. तसेच, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे आणि महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
