हिंदमाता परिसरामध्ये दरवर्षी पाणी साचते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून भूमिगत टाक्या बांधण्याचा प्रयोग परळ हिंदमाता परिसरात केला होता. या भागात सलग दोन वर्षे पाणी न साचल्याने पालिकेने स्वतःची पाठही थोपटून घेतली होती. मात्र, सोमवारी (18 ऑगस्ट) झालेल्या मुसळधार पावसात हिंदमाता भागात पुन्हा पाणी तुंबलं. पालिकेने सातही पाणीउपसा पंप कार्यान्वित करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
Mumbai Red Alert: 24 तास धोक्याचे! मुंबईकर गरज असेल तरच बाहेर पडा, नवी मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
सोमवारी हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साचलं होतं. अनेक वाहनं रस्त्यातच बंद पडली होती. दुकानांमध्येही पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी डॉ. आंबेडकर मार्गावरील वाहतूक बंद ठेवून ती पुलावरून वळवण्यात आली. हिंदमाता परिसरात भूमिगत टाकी बांधलेली असली तरी तिची क्षमता ताशी 55 मिलीमीटर पावसाचे पाणी साठवू शकेल एवढीच आहे. त्यापेक्षा जास्त पाऊस पडला तर या परिसरात पाणी भरणारच हे सिद्ध झालं . त्यामुळे हिंदमातातील भूमिगत टाक्यांचा प्रयोग फसला, अशी टीकाही नागरिकांकडून होत आहे.
हिंदमाताशिवाय, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, षण्मुखानंद सभागृह परिसर हा भागही सोमवारी पाण्याखाली गेला होता. याठिकाणी मिनी पंपिंग स्टेशन उभारण्यात आलं आहे, पर्जन्यवाहिन्यांचा विस्तार केला आणि नव्या पर्जन्यवाहिन्या बांधल्या होत्या, तरी देखील पाण्याचा योग्य निचरा होऊ शकला नाही.
महापालिका कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ
पावसाच्या संततधारेमुळे निचरा वेगाने होण्यात अडचणी निर्माण झाल्या. सोमवारी महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते, पंप ऑपरेटर, आरोग्य कर्मचारी आणि आपत्कालीन पथकं परिस्थितीवर लक्ष ठेवून होती. पाण्याचा निचरा वेगाने व्हावा, यासाठी मॅनहोल उघडून पाण्याचा निचरा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं. पर्जन्य जलवाहिनी यंत्रणा, सांडपाणी व्यवस्था, सबमर्सिबल केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात आलं होतं. पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात आल्या.