कूपर रुग्णालयामधील उंदरांची कुरतडल्याची घटना आणि इतर घटनांवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. विलेपार्ले येथील डॉ. रु. न. कूपर रुग्णालयात. प्रशासकीय आणि इतर बाबींमुळे निर्माण झालेल्या समस्या तसेच जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि मूषक प्रतिबंध यासाठी तत्काळ उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
तीन वरिष्ठ सदस्य समिती
रुग्णालयातील कामकाज आणि इतर बाबींवर त्वरेने कार्यवाही होण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाने तीन वरिष्ठ सदस्य असणारी पर्यवेक्षकीय समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. (श्रीमती) नीलम अंद्राडे, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून यापूर्वी कामकाज सांभाळलेले आणि नायर रुग्णालयाचे विद्यमान अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांचा समावेश आहे. या समितीमार्फत रुग्णालयातील परिस्थितीवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे. समितीचे तीनही सदस्य वैयक्तिक पाठपुरावा करून प्रशासकीय कारणांमुळे उद्भवलेल्या समस्या दूर करीत आहेत. परिणामी रुग्णालयातील कामकाज पूर्वपदावर येत आहे.
advertisement
संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. (श्रीमती) नीलम अंद्राडे यांच्याकडे कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता म्हणून कामकाज सोपवण्यात आले आहे. रुग्णालयातील वेगवेगळ्या उपाययोजना गतिमान करण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे.
१) कूपर रुग्णालयातील प्रशासकीय व्यवस्था गतिमान करण्यात आली आहे. या रुग्णालयाचा कारभार हाती घेऊन संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. नीलम अंद्राडे यांनी मागील तीन आठवड्यात ८५० नस्ती (files) मार्गी लावल्या आहेत. ३५० कार्यादेश प्रदान करून रुग्णांसाठी औषधी आणि आवश्यक असणारी इतर साधने यांची उपलब्धता होईल, याची खात्री केली जात आहे.
२) कूपर रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवेसाठी सकाळी लवकर म्हणजे ७.३० वाजेपासून नोंदणी केली जात आहे. तसेच नोंदणी सहाय्यक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ५ खिडक्यांवर नोंदणी होत आहे. परिणामी रुग्ण नोंदणीसाठी आता रिघ लागत नाही.
३) रुग्णालयातील औषधालयाची वेळ सायंकाळी ४.३० ऐवजी आता सायंकाळी ७.३० पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना औषधी प्राप्त करण्यासाठी अधिक वेळ मिळतो आहे.
४) रुग्णालय आणि परिसरातील स्वच्छतेवर दैनंदिन लक्ष ठेवण्यासाठी स्वच्छता समिती नेमण्यात आली आहे.
५) सर्व परिसरात तसेच महत्त्वाच्या भागात मूषक / उंदीर पकडण्यासाठी पिंजरे व गोंदफास (Rat cages and glue traps) लावण्यात आले आहेत.
६) संपूर्ण रुग्णालय परिसराची तपासणी करून सर्व भिंतींमध्ये, कानाकोपऱ्यांमध्ये असणारे बीळ (Rat hole) बुजवण्यात आले आहेत. तसेच, सांडपाणी आदी वाहिन्या (पाईप्स) मध्ये उंदीर शिरू नयेत म्हणजे जाळ्या लावण्यात येत आहेत.
७) के/पश्चिम विभागातील कीटकनाशक अधिकारी (Pest Control Officer) यांनी कूपर रुग्णालयात दररोज फेरी करून उपाययोजनांची पाहणी करावी, यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
८) रुग्ण व नातेवाईक यांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी रुग्णालयातील कक्षांबाहेर भित्तिपत्रके / माहितीफलक प्रदर्शित करण्यात आले आहेत.
९) के/पश्चिम विभाग अंतर्गत कीटकनाशक विभागाकडून मिळणारे तपासणी अहवाल त्वरित अंमलात आणले जात आहेत.
१०) रुग्णांचे नातेवाईक आणि भेट देणारे नागरिक यांनी नेमून दिलेल्या जागा आणि कचरापेटी वगळता इतरत्र कोठेही कचरा टाकू नये, यासाठी देखरेख यंत्रणा अधिक सक्त करण्यात आली आहे.
११) जैववैद्यकीय कचऱ्याची (Bio Medical Waste) दररोज वेळेवर व सहायक वैद्यकीय अधिकारी (AMO) यांच्या सक्त देखरेखीखाली विल्हेवाट लावली जात आहे.
१२) मूषक / उंदीर समस्या का निर्माण झाली आणि त्यावर दीर्घकालीन उपाय काय असावेत, इत्यादी बाबी सुचविण्यासाठी प्राथमिक चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य संस्थांमध्ये रुग्णांची सुरक्षितता, स्वच्छता व दर्जेदार आरोग्यसेवा पुरविणे हे प्रशासनाचे प्राधान्य आहे. सदर परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सर्व आवश्यक पावले युद्धपातळीवर उचलण्यात येत आहेत,असे महापालिकेने शेवटी सांगितले.