नेमका अपघात कसा झाला?
नागपूर-चंद्रपूर महामार्गावर बुटीबोरी येथील नवीन एमआयडीसी परिसरात 'अवाडा' ही सोलर पॅनल निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीचे सध्या विस्तारीकरणाचे आणि बांधकामाचे काम सुरू आहे. कंपनीच्या आवारात एक मोठी पाण्याची टाकी बांधण्यात येत होती. शुक्रवारी या वॉटर टँकची टेस्टिंग केली जात होती. पण अचानक टाकीत 'वॉटर ब्लास्ट' होऊन संपूर्ण टाकी कोसळली.
advertisement
या अपघातावेळी टाकीच्या परिसरात अनेक कामगार कार्यरत होते. या दुर्घटनेत ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच ३ कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. इतर ४ कामगारांना किरकोळ दुखापत झाली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
दोषींवर कठोर कारवाईचे संकेत
घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाकडून या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. टाकीच्या बांधकामात काही त्रुटी होत्या का? याचा तपास केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक तज्ज्ञांकडून अहवाल मागवण्यात येईल. चौकशीत बांधकामात हलगर्जीपणा किंवा निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे आढळल्यास, संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील.
