नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज पार पडत आहे. या उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. के राधाकृष्णन हे उपस्थित आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शतकोत्तर वर्षात पदार्पण करणार असल्याने आज सरसंघचालक डॅा. मोहन भागवत यांच्या भाषणाकडे देशाचं लक्ष आहे. गामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव महत्त्वाचा ठरणार आहे. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर या विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आलं असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत.
advertisement
भारत पुढे जाऊ नये यासाठी काही शक्ती कार्यरत
मनुष्यजीवन प्रगतीमुळे सुखी आहे. इस्राएल सोबत हमास युद्धामुळे सर्वांना चिंता आहे. आपला देश पुढे चालला आहे. शिक्षा, तंत्रज्ञानमध्ये समाजाची समज पुढे चालली आहे. जम्मू काश्मीरची निवडणूक शांतीपूर्ण झाली. भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. पर्यावरणबाबत आपला दृष्टिकोन जगात स्वीकार्य आहे. देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न शासन, प्रशासन, शेतकरी, युवकांकडून होत आहे. देश पुढे जाईल पण आव्हाने समोर आहेत. केवळ संघ, हिंदू समाज समोर, भारतासमोर आव्हान नसून पूर्ण जगासमोर आव्हान आहे. भारत पुढे गेला नाही पाहिजे असं वाटणाऱ्या काही शक्ती आहेत. त्यांचा विरोध होणारच,तसं होत देखील आहे.
बांगलादेशातील हिंदूंना मदतीची गरज
बांगलादेशात हिंदुवर वारंवार अत्याचार होत आहे. पहिल्यांदा हिंदू आपल्या रक्षणासाठी एकत्रित आला. बांगलादेश मध्ये हिंदूंना भारत सरकारच्या मदतीची गरज आहे. हिंदू दुर्बल होईल तर अत्याचार होतील. बांगलादेश मध्ये अशी चर्चा आहे की भारतापासून त्यांना भीती असून पाकिस्तान आपला खरा मित्र आहे. ज्या बांगलादेशला भारताने पूर्ण मदत केली तिथे अश्या चर्चा होतात त्या कोणत्या देशाच्या फायद्याच्या आहेत? भारत सामर्थ्यवान झाला तर त्याचा धोका वाटतो.
कलकत्त्यात दोषींना संरक्षण दिलं गेलं
देशात सांस्कृतिक मूल्य तुडविले जात आहे त्यासाठी वेळीच सावध व्हावं लागेल. लहान मोठ्यांच्या हाती मोबाईल आहे. घरी काय पाहायचं काय पाहू नये यावर नियंत्रण नाही. विधी व्यवस्थेत यावर कायदा बनवण्याची आवश्यकता आहे. याबाबत कठोरता नसल्याने युवा पिढी नशेच्या गर्तेत जातेय. जो नशा करणार नाही त्याला मागास समजलं जातंय. कलकत्तामध्ये जे रुग्णालयात घडलं ते लज्जास्पद होतं. ही एक घटना नाही, अश्या घटना घडू नये या करिता सुरक्षा दिली पाहिजे. दोषींना अपराध झाल्यावर संरक्षण देण्यात आलं.