दुचाकीवर झडप, युवक गंभीर जखमी
ही वाघीण तीन बछड्यांसह या भागात वास्तव्य करत होती. तिच्या अधिवासातूनच राष्ट्रीय महामार्ग जात असला, तरी गेल्या अनेक महिन्यांत तिने मानवी वाहनांवर कधीही हल्ले केले नव्हते. मात्र, गेल्या चार दिवसांत तिचा स्वभाव पूर्णतः बदलल्याचे वनाधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. दोन दिवसांपूर्वी या वाघिणीने महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीवर झडप घातली. या घटनेत खांबाळा येथील नागेश गायकी गंभीर जखमी झाले. यानंतर वाहनचालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
advertisement
बछड्याच्या विरहात वाघीण संतप्त
वाघिणीचे तीन बछडे होते. मात्र आता तिच्या सोबत फक्त दोन बछडेच दिसत आहेत. हरवलेला बछडा महामार्गावरील अपघातात मृत पावल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आपल्या बछड्याचा शोध घेण्याची धडपड आणि त्याच्या विरहातील अस्वस्थता यामुळे वाघीण संतप्त होऊन वाहनांवर हल्ला करत असल्याचा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, रस्त्यांलगत सापडलेल्या बछड्याच्या अवशेषांचे नमुने तपासणीसाठी नागपूरच्या गोरेवाडा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. डीएनए अहवाल आल्यानंतर बछड्याच्या ओळखीची अधिकृत पुष्टी होणार आहे, अशी माहिती वनविभागाने दिली आहे. या घटनेनंतर परिसरात सतर्कता वाढविण्यात आली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर केसलाघाट परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळेत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.






