हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पालकमंत्री पदावरून एक मिश्किल वक्तव्य केलं आहे. मी पहिल्यांदाच मंत्री झालो आणि पहिल्यांदाच पालकमंत्री देखील झालो आहे. पालकमंत्री झाल्यानंतर हिंगोलीत आलो आहे. इथे आल्यानंतर असं ऐकलं की हा अल्प जिल्हा आहे. गरीब जिल्हा आहे. आता सोमवारी गेल्यावर मी शासनाला पहिलं विचारणार आहे की, गरिबाला गरीब जिल्हाच का दिला? असं मिश्कील वक्तव्य अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केला आहे. ते वसमत शहरात आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी कार्यक्रमात एकच हशा पिकला होता.
advertisement
कुठलीही नाराजी नाही मी टोचून बोललेलो नाही : नरहळी झिरवाळ
परंतु पालकमंत्री पदावरून कुठलीही नाराजी नाही मी टोचून बोललेलो नाही. तर हिंगोली जिल्ह्याचे काम एक चॅलेंज म्हणून करणार आहे अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. तसेच राज्यात नाशिक व रायगड पालकमंत्री पदाचा तिढा आहे. या तिढ्यावर बोलताना मंत्री झिरवाळ म्हणाले की हा तिढा तिन्ही पक्षाचे वरिष्ठ मिळून सोडवतील.
जयप्रकाश दांडेगावकर आणि माझे जुने संबंध : नरहरी झिरवाळ
पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी रात्री वसमत येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची भेट घेतली. या भेटीवरून जिल्ह्यात राजकीय चर्चा सुरू झाल्या. यावर मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की जयप्रकाश दांडेगावकर आणि माझे जुने संबंध आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजकारणच करत राहिले तर दिवस असेच निघून जातील. ही केवळ सदिच्छा भेटच आहे. आता तुम्हाला हवं ते समजवायचं ते समजा अशी प्रतिक्रिया त्यांनी या भेटीवर दिली आहे.