नाशिक : विधानसभा निवडणुकीआधी नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्र्याने शिंदेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीआधीच त्यांनी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता विधानसभेआधी त्यांनी शिवसेनेरा रामराम केलाय. बबन घोलप यांचा मुलगा योगेश घोलप यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
माजी समाज कल्याण मंत्री बबन घोलप यांनी लोकसभेआधी एप्रिल महिन्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. आता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना त्यांनी मागण्या मान्य न झाल्याने हा निर्णय घेत असल्याचं सांगितलंय. ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून पूत्र योगेश घोलप यांना निवडून आणण्यासाठी मदत करणार आहे असंही म्हटलंय. ठाकरे गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. यात नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली मतदारसंघातून योगेश घोलप यांना उमेदवारी दिलीय.
advertisement
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 23 उमेदवार, मुंबईत तीन जागा लढणार, कुणाचा पत्ता कट, कुणाला संधी?
बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनाम्याचं पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी म्हटलं की, मी सहा एप्रिलला आपल्या शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. यात माझ्या समाजाच्या काही मागण्या मागितल्या होत्या. मतदारसंघातील काही कामे करण्याचे आपण मान्य केले होते. पण यापैकी एकही मागणी मान्य झाली नाही.
समाजाच्या मागण्या मान्य न झाल्याने समाज फार नाराज झाला आहे आणि आता माझ्या मुलाला शिवसेनेनं तिकीट देऊन माझ्यावर फार मोठे उपकार केले आहेत. म्हणून शिवसेना शिंदे गट पक्षाचा राजीनामा देत असल्याचं बबन घोलप यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेत जाताना म्हणाले ठाकरे गटात अन्याय झाला
ठाकरे गटातून शिवसेनेत जाताना बबनराव घोलप यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली होती. ५४ वर्षे बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून काम केलं. तरी ठाकरे गटाकडून अन्याय झाला. संपर्कप्रमुख पदावरून काढलं. तिथं काहीतरी काळंबेरं झालं असेल. म्हणूनच उपनेते पदाचा राजीनामा दिला असं ते म्हणाले होते. शिंदे हे गोरगरिबांचं काम करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असंही घोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करताना म्हटलं होतं.
