जागा वाटपावर नाराज, इच्छुकांचे बंड
यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाआघाडीत तीन प्रमुख पक्ष असल्याने जागा वाटपाचा तिढा वाढला आहे. दोन्ही आघाड्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बंडखोरीचा धोका संभवत आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर करताना काळजी घेतली जात आहे. नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजित पवारांच्या गटाचे नेते समीर भुजबळ यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. समीर भुजबळ हे नाशिकमधील नांदगाव येथून इच्छुक होते. मात्र, जागा वाटपाच्या चर्चेत ही नांदगावची जागा ही शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आली आहे. या ठिकाणी शिंदे गटाचे सुहास कांदे हे आमदार आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघावरून महायुतीमध्ये हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा दिसण्याची शक्यता आहे.
advertisement
सुहास कांदे यांना आव्हान
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघ महायुतीतील शिंदेच्या शिवसेनेकडे गेला आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. याच मतदार संघात समीर भुजबळ देखील इच्छुक आहेत. मात्र समीर भुजबळ यांना ही उमेदवारी न मिळाल्याने ते अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. नांदगाव मधून मागील निवडणुकीत सुहास कांदे यांनी पंकज भुजबळांचा पराभव केला होता.
अपक्ष की तुतारी?
समीर भुजबळ यांच्या बंडाची कुणकुण लागताच अजित पवारांनी त्यांना पक्ष सोडण्यास सांगितले असल्याची चर्चा होती. समीर भुजबळ नांदगावमधून आता अपक्ष लढणार की तुतारी हाती घेत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
