राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची दर मंगळवारी होणारी आढावा बैठक मंत्री दत्ता भरणे यांचे शासकीय निवासस्थान सिद्धगड बंगल्यावर मंगळवारी रात्री पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे, सना मलिक आदी उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी विशेषतः शरद पवार गटाबरोबर पक्षाच्या संभाव्य विलिनीकरणावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत उपस्थित पदाधिकारी, आमदार आणि कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली. बैठकीत दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत सकारात्मक भूमिकाच घेतली. मात्र, यामध्ये काही अटी आणि स्पष्ट अडचणीही व्यक्त करण्यात आल्या.
advertisement
विलिनीकरणाच्या अटी काय? बैठकीत काय झालं
बैठकीत बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचेच नेतृत्व कायम ठेवूनच शरद पवार गटासोबत एकत्र यावे, अशी भूमिका मांडली. "आजच्या राजकीय परिस्थितीत अजित दादांनी घेतलेला व्यावहारिक दृष्टिकोन आणि त्यांचं प्रशासनातील अनुभव हे पक्षासाठी अधिक फायदेशीर ठरेल," असे मत अनेक आमदारांनी यावेळी व्यक्त केले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच पक्ष एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचा सूर बहुतांश वक्त्यांच्या भाषणातून दिसून आला.
दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत देखील स्पष्ट भूमिका काही कार्यकर्त्यांनी मांडली. "सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील राजकारणात पक्षाचं नेतृत्व करावं, परंतु महाराष्ट्रातील निर्णयप्रक्रियेत त्यांनी हस्तक्षेप करू नये," असे स्पष्ट मत काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नोंदवलं. त्यांच्या कामाची प्रशंसा करतानाच राज्यस्तरीय नेतृत्व अजित दादांकडेच असावं, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय, पक्षातील फुटीनंतर अजित पवार आणि इतरांविरोधात खालच्या पातळीवर केलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. याआधी बोचऱ्या शब्दात टीका करणाऱ्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना विलिनीकरणानंतर पक्षात घेऊ नये, असे मतही काहींनी मांडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.