महापालिका निवडणुका अगदी तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. अजित पवार आणि पिंपरी चिंचवडचे खास नाते आहे. महापालिकांना निवडणुकांना अद्याप तीन चार महिने बाकी असले तरी अजित पवार यांनी कंबर कसून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये दोन दिवसीय दौरा केला.
advertisement
कार्यकर्त्यांचा आग्रह, अजितदादांची सुरुवातीला नकार घंटा पण...
बैलजोडीचे पूजन करण्यासाठी आलेल्या अजित पवारांना बैलजोडीच्या मधोमध उभे राहून बैलांची वेसण (नाकदोरी) हातात घ्यावी, असा आग्रह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धरला. त्यावर 'अरे बाबांनो, असं नको,' म्हणत अजित पवारांनी सुरुवातीला नकार दिला. पण कार्यकर्त्यांचा आग्रहच एवढा होता की अजित पवार यांना ऐकणे भाग पडले.
बैलांसारख्या प्राण्यांबरोबर कधीही जवळचा संबंध न आल्याने त्यांना हे थोडं अवघड वाटत होतं. तरीही, कार्यकर्त्यांनी, "दादा, काही होत नाही", असे म्हणत आपला हट्ट कायम ठेवला. अखेर, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अजित पवारांनी एका बैलाची वेसण हातात घेतली आणि फोटो काढले. फोटोसेशन झाल्यानंतर अजित पवार यांनी सुटकेचा नि:श्वास टाकत पुढच्या काही मिनिटांत लगेचच गाडी पकडली आणि पिंपरी-चिंचवडमधील आपला दोन दिवसांचा दौरा संपवून तेथून रवाना झाले.
अजित पवार यांचा दोन दिवसीय पिंपरी चिंचवडचा दौरा का महत्त्वाचा?
पिंपरी चिंचवड शहरावर २०१७ पर्यंत अजित पवार यांचे शहरावर एकहाती वर्चस्व होते. मात्र तत्कालिन आणि आताचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी अतिशय सूक्ष्म रणनीती आखून अजित पवार यांचे वर्चस्व ठरवून मोडित काढले. अजित पवार यांच्याच एकेकाळच्या सहकाऱ्यांना भाजपमध्ये आणून फडणवीस यांनी आव्हान उभे केले. शहरावरील गमावलेले वर्चस्व पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून महापालिका निवडणुकीच्या आधी जनसंवाद कार्यक्रम घेऊन आतापासून मतदार राजापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे नियोजन आहे.