सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) मोठ्या राजकीय हालचाली सुरू असून, खासदार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे नवी जबाबदारी देण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात?
अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर आता कोणाला संधी मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजितदादांचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांना बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उतरवण्याचा विचार पक्षात सुरू आहे. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार असल्या तरी, बारामतीचा बालेकिल्ला राखण्यासाठी त्यांना विधानसभेच्या मैदानात उतरवले जाऊ शकते.
advertisement
पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लागणार?
दुसरीकडे, पार्थ पवार यांना सक्रिय राजकारणात पुन्हा मोठी संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. सुनेत्रा पवार यांनी विधानसभा लढवल्यास, त्यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना पाठवण्याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये खल सुरू आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवून दिल्लीच्या राजकारणात त्यांना सक्रिय करण्याचा पक्षाचा मानस असल्याचे सूत्रांनी सांगितले. पार्थ पवार यांनी एकदा लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
पक्षांतर्गत निर्णयाची प्रतीक्षा
पार्थ पवार यांना राज्यसभा द्यावी का आणि सुनेत्रा पवारांना विधानसभेला उतरवावे का, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा कोअर कमिटीचा गट लवकरच अधिकृत निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजितदादांच्या पश्चात पक्ष सावरण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनाच पुढे करणे, हाच एकमेव पर्याय सध्या पक्षासमोर असल्याचे बोलले जात आहे.
