उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भवितव्याबाबत निर्माण झालेल्या मुद्यावर मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी बारामती येथे पवार कुटुंबाची एक अत्यंत महत्त्वाची आणि खासगी बैठक पार पडली. या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत पक्षाशी संबंधित कोणताही राजकीय निर्णय हा केवळ आणि केवळ पवार कुटुंबच घेणार," यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली.
advertisement
राष्ट्रवादीची 'पॉवर' पवार कुटुंबाकडेच?
अजितदादांच्या पश्चात पक्षाचे नेतृत्व कोण करणार आणि विलीनीकरणासारखे मोठे निर्णय कोण घेणार, यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, आजच्या बैठकीत पक्षांतर्गत निर्णयांमध्ये पवार कुटुंबीय एकत्रितपणे निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता सत्तेत सहभागी व्हायचे की नाही? दुसऱ्या गटात विलीनीकरण करायचे की नाही? पक्षात कोणाला कोणते पद द्यायचे? या सर्व कळीच्या प्रश्नांचे अधिकार आता केवळ पवार कुटुंबाकडे असणार आहेत.
राजकीय गोंधळ टाळण्यासाठी निर्णय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पक्षातील काही वरिष्ठ नेते विलीनीकरणाबाबत किंवा पदांबाबत वेगवेगळी विधाने करत होते. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. हा संभ्रम रोखण्यासाठीच पवार कुटुंबाने एकत्र येत हे अधिकार आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.
