पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी आपल्या भाषणात विविध मुद्यावर भाष्य करताना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य केले आहे.
काहींना लय घाई झालीय, जरा धीर धरा...
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खासदार निलेश लंके यांनी म्हटले की, अरे धीर धरा...काही लोकांना लय घाई झाली आहे. आपल्या नेत्याला (शरद पवार) राजकारणातील सगळी गणितं, फायदे-तोटे समजतात. त्यामुळे तु्म्ही काही बोलू नका. आपण हाफ पँटमध्ये फिरत असताना आपला नेता हा राज्यातलं नाही तर देशाचं राजकारण करत होता. शरद पवार हे स्वत: साठी नाही तर सगळ्यांसाठी समाजासाठी जगले असल्याचे लंके यांनी सांगितले.
advertisement
शरद पवार यांच्या मनात काय सुरू आहे, याचा अंदाज अनेकांना येत नाही. याचा संदर्भ घेत लंके म्हणाले की, शरद पवार काय आहे, अनेक कोणाला कळले नाही. तुम्हाला कळले तर सांगा. शरद पवार शांत का असतात हे तुम्हाला कळलं तर मी तुमच्यासमोर लोटांगण घेईल असे त्यांनी म्हटले.
निलेश लंके उशिराने आले, अनुपस्थितीमुळे सुरू होती चर्चा...
दरम्यान, आजच्या कार्यक्रमात शरद पवार गटाचे दोन खासदार अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले होते. अमर काळे आणि निलेश लंके हे कार्यक्रम सुरू झाला तरी अनुपस्थित होते. वर्धाचे खासदार अमर काळे यांनी सांगितले की, एका संसदीय समितीमध्ये माझा समावेश आहे. या बैठकीच्या निमित्ताने मी सध्या ओडिशामध्ये आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर नेत्यांच्या संमतीने आपण या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अनुपस्थित असल्याचे त्यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना सांगितले. तर, दुसरीकडे नगरचे खासदार निलेश लंके यांनी देखील आपण उशिराने पोहचत असल्याचे सांगितले. एका ठिकाणी अपघात झाला होता. त्यावेळी या अपघातामधील जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यापासून ते उपचाराची व्यवस्था करत असल्याने उशीर होत असल्याचे लंके यांनी म्हटले.