कराड: काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतांची चोरी कशी झाली, याबद्दल निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने कोणतीही प्रतिक्रिया दिली. सोमवारी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं केली. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघात लोकसभेला जी नावं मतदार यादीत नव्हती. मात्र विधानसभेला नावं असल्याची माहिती आता समोर आली आहे.
advertisement
काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा देशभर उचलला असताना आता साताऱ्यातील कराड दक्षिण मतदार संघातील कापील गोळेश्वर गावात 2024 विधानसभा निवडणुकीत बोगस मतदार नोंद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत तहसील कार्यालयकडून पंचनामा करण्यात आला असून सदरची नावे 2024 लोकसभा निवडणूक यादीत समाविष्ट नव्हती, मात्र 2024 विधानसभा निवडणुक यादीत समाविष्ट आहेत. परंतु. ती नावे कशी समाविष्ट झाली यांचा कोणताही पुरावा नसल्याने कमी करावे, असे पंचनाम्यात तहसील कार्यालय कराड यांनी म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदार नोंदणीत गोलमाल झाल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी केला आहे.
गणेश पवार या सामाजिक कार्यकर्त्यांने कापील गोळेश्वर येथील बोगस मतदान नोंदणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून गुन्हे दाखल न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
कराड दक्षिण मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला होता. तर भाजपचे डाँ. अतुल भोसले यांचा विजय झाला. काँग्रेसकडून कराड दक्षिण मतदारसंघात वारंवार बाहेरील मतदार वाढवल्याचा आरोप केला जात आहे. आता तहसील कार्यालयाच्या पंचनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार अतुल भोसले काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.
